Gadar 2 | अखेर ‘तारा सिंग’ने ‘बाहुबली 2’ला पछाडलं; ‘जवान’च्या वादळातही ‘गदर 2’चा नवा विक्रम
बॉक्स ऑफिसवर शाहरुख खानच्या 'जवान'चं वादळ असतानाही सनी देओलच्या 'गदर 2'ने नवा विक्रम रचला आहे. प्रभासच्या 'बाहुबली 2'ला या चित्रपटाने मागे टाकलं आहे. प्रदर्शनाच्या तिसाव्या दिवशीही चित्रपटाची दमदार कमाई सुरू आहे.
मुंबई | 11 सप्टेंबर 2023 : सनी देओलच्या ‘गदर 2’ या चित्रपटाला बरोबर महिना पूर्ण झाला आहे. 11 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने पहिल्याच दिवसापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. प्रदर्शनाच्या दिवशी ‘गदर 2’ने तब्बल 40 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. चित्रपटासाठी ही अत्यंत दमदार सुरुवात होती. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून सनी देओलसुद्धा भावूक झाला होता. आता प्रदर्शनाच्या तिसाव्या दिवशीही ‘गदर 2’ने नवा विक्रम रचला आहे. सनी देओलच्या चित्रपटाने एस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली : द कन्क्लुजन’च्या हिंदी व्हर्जनचा विक्रम मोडला आहे. त्यामुळे शाहरुख खानच्या ‘पठाण’नंतर हा भारतातील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा हिंदी चित्रपट ठरला आहे.
तिसाव्या दिवशीही दमदार कमाई
सनी देओल आणि अमीषा पटेल यांच्या ‘गदर 2’ने तिसाव्या दिवशी 1.45 कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाने भारतात आतापर्यंत 512.35 कोटी रुपये कमावले आहेत. तर 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या प्रभासच्या ‘बाहुबली 2’ने हिंदी भाषेत 510.99 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. एकीकडे बॉक्स ऑफिसवर शाहरुखच्याच ‘जवान’ची क्रेझ पहायला मिळत असतानाही ‘गदर 2’ अजूनही चांगली कमाई करतोय. शाहरुखच्या ‘पठाण’ने 524 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांच्या यादीत तो अजूनही पहिल्या स्थानी आहे. तर ‘गदर 2’ दुसऱ्या स्थानी आहे. हा विक्रम ‘जवान’ने मोडल्यास ‘गदर 2’ तिसऱ्या स्थानी जाईल.
पठाण VS जवान
7 सप्टेंबर रोजी जन्माष्टमीच्या मुहूर्तावर शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित ‘जवान’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी शाहरुखच्याच ‘पठाण’चा विक्रम मोडला. ‘पठाण’ने पहिल्या दिवसी 57 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर ‘जवान’ने प्रदर्शनाच्या दिवशी तब्बल 75 कोटी रुपये कमावले.
‘गदर 2’ हा 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटाला सीक्वेल आहे. यामध्ये सनी देओल, अमीषा पटेल, उत्कर्ष शर्मा यांच्या मुख्य भूमिका आहेत. अनिल शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ‘गदर 2’च्या प्रचंड यशानंतर आता ‘गदर 3’चीही जोरदार चर्चा आहे.