सुशांत सिंह राजपूतच्या ऑनस्क्रीन आजीचं निधन; इंडस्ट्रीवर शोककळा
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री आर. सुब्बालक्ष्मी यांचं निधन झालं. 'दिल बेचारा' या चित्रपटात त्यांनी दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आजीची भूमिका साकारली होती. त्यांनी थलपती विजयसोबतही काम केलंय. सुब्बालक्ष्मी यांच्या भूमिका कायम प्रेक्षकांच्या स्मरणात राहतील.
केरळ : 2 डिसेंबर 2023 | हे वर्ष संपत असताना फिल्म इंडस्ट्रीतून दु:खदायक बातमी समोर येत आहे. 30 नोव्हेंबर रोजी दिग्गज अभिनेत्री आर. सुब्बालक्ष्मी यांचं निधन झालं. त्यांना रात्री उशिरा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुब्बालक्ष्मी यांनी त्यांच्या दमदार अभिनयकौशल्याच्या जोरावर चाहत्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं. त्यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
प्रेक्षकांच्या मनावर केलं राज्य
आर. सुब्बालक्ष्मी यांची अचानक तब्येत बिघडली होती. त्यानंतर 30 नोव्हेंबर रोजी त्यांना केरळमधल्या तिरुवनंतपुर इथल्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याच रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्यांना श्रद्धांजली वाहिली. सुब्बालक्ष्मी या मल्याळम चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. त्यांनी बॉलिवूडमध्येही काही चित्रपटांमध्ये काम केलं. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि थलपती विजय यांच्यासह इतर अनेक कलाकारांसोबत त्यांनी स्क्रीन शेअर केली आहे.
सुशांतच्या आजीच्या भूमिकेत आठवणीत
सुब्बालक्ष्मी यांनी थलपती विजयसोबत ‘बीस्ट’ या चित्रपटात काम केलं होतं. तर सुशांत सिंह राजपूतसोबत त्यांनी त्याच्या ‘दिल बेचारा’ या चित्रपटात भूमिका साकारली होती. यामध्ये त्या सुशांतच्या आजीच्या भूमिकेत होत्या. याशिवाय अदा शर्माच्या ‘द केरळ स्टोरी’मध्येही त्यांनी काम केलंय. सुब्बालक्ष्मी या अभिनेत्रीसोबतच उत्तम चित्रकारही होत्या. इतकंच नव्हे तर संगीत विश्वातही त्यांनी नाव कमावलंय. त्यांनी अनेक मल्याळम चित्रपटांमध्ये अविस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत.
सुब्बालक्ष्मी या कल्याणरमन (2002), नंदनम (2002) आणि पांडिप्पा (2005) यांसारख्या चित्रपटांसाठी विशेष ओळखल्या जातात. त्यांनी आपल्या दमदार अभिनयकौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. थारा कल्याणच्या आईच्या रुपात त्या चाहत्यांना नेहमीच लक्षात राहतील. आर. सुब्बालक्ष्मी यांच्या निधनावर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि मल्याळम अभिनेते दिलीप यांनी शोक व्यक्त केला.