Gayatri Joshi | अपघातानंतर अशी होती गायत्री जोशीची अवस्था; कार क्रॅशनंतर फोटो समोर
दोन ते तीन गाड्यांची एकमेकांना जोरदार टक्कर झाल्यानंतर फरारीला आग लागली. त्यामुळे त्या गाडीत असलेल्या 63 वर्षीय मेलिसा क्रॉटली आणि 67 वर्षीय मार्क्स क्रॉटली यांचा मृत्यू झाला. हा अपघात घडत असताना त्यांच्या कारच्या मागे असलेल्या एका कारच्या डॅश कॅममधून अपघाताचा व्हिडिओ शूट झाला.
मुंबई | 6 ऑक्टोबर 2023 : ‘स्वदेस’ या चित्रपटात अभिनेता शाहरुख खानसोबत मुख्य भूमिका साकारलेली अभिनेत्री गायत्री जोशी इटलीतील भीषण कार अपघातामुळे चर्चेत आली. इटलीतल्या सार्डिनिया याठिकाणी दोन-तीन सुपरकार्सनी एका कॅम्परवॅनला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ती कॅम्परवॅनच उलटली. या अपघातात मागे असलेल्या फरारी कारला आग लागली आणि त्यात वृद्ध स्विस दाम्पत्याचा मृत्यू झाला. आता या अपघाताच्या तीन दिवसांनंतर अशी माहिती समोर येत आहे की इटली पोलिसांकडून गायत्री जोशी आणि तिचा पती विकास ओबेरॉय यांची चौकशी होऊ शकते. कारण ज्या दोन-तीन गाड्यांची टक्कर झाली, त्यापैकी लँबॉर्गिनी या सुपरकारमध्ये गायत्री आणि विकास होते. नुकताच सोशल मीडियावर या अपघातानंतरचा एक फोटो व्हायरल होत आहे.
2 ऑक्टोबर रोजी झालेल्या या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. या अपघाताचे फोटो आणि व्हिडीओ पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इटली पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत. सुदैवाने या अपघातात गायत्री आणि तिच्या पतीला कोणतीच गंभीर दुखापत झाली नाही. मात्र जर गायत्रीचा पती विकास याप्रकरणी दोषी आढळल्यास त्याला सात वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.
Two deaths on a Ferrari in Sardina, Italy pic.twitter.com/skT3CaXg0T
— Globe Clips (@globeclip) October 3, 2023
सोशल मीडियावर अपघातानंतरचा एक फोटो समोर आला आहे. हा फोटो अपघाताच्याच दिवसाचा आहे. फोटोमध्ये रस्त्याच्या बाजूला क्रॅश झालेली निळी कार पहायला मिळतेय. तर रस्त्यावर काही लोक उभे आहेत. एक महिला तिथेच रस्त्यावर स्तब्ध बसलेली पहायला मिळतेय. ही महिला गायत्रीच असल्याचं म्हटलं जात आहे. अपघाताच्या वेळी गायत्रीचा पती विकास हा लँबोर्गिनी हुरेकन स्पायडर (Lamborghini Huracan Spyder) ही अत्यंत महागडी कार चालवत होता. नवी दिल्लीत या कारची किंमत तब्बल चार कोटी रुपये इतकी आहे.
कोण आहे गायत्रीचा पती विकास ओबेरॉय?
गायत्री जोशीचा पती विकास ओबेरॉय हे ओबेरॉय रियॅल्टी लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. ओबेरॉय रियॅल्टी लिमिटेडची स्थापना रणवीर ओबेरॉय यांनी तीन दशकांपूर्वी केली होती. प्रॉपर्टी व्यतिरिक्त विकास हे हाऊसिंग, कॉर्पोरेट, हॉस्पिटल आणि रिटेलमध्येही गुंतवणूक करतात. विकास ओबेरॉय हे मुंबईतील प्रसिद्ध वेस्टीन हॉटेलचे मालकसुद्धा आहेत.