T20 World Cup जिंकल्यानंतर विराटचा अनुष्काला व्हिडीओ कॉल; भरभरून प्रेमाचा वर्षाव
या विजयानंतर रोहित शर्मा, हार्दिक पांड्या यांच्यासह प्रशिक्षक राहुल द्रविड यांना अश्रू अनावर झाले. सध्या देशभरातून टीम इंडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींनीही खास पोस्ट लिहिल्या आहेत.
टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताच्या दमदार यशानंतर प्रत्येक भारतीय खुश आहे. देशभरात ढोल-ताशे वाजत आहेत. विजयानंतर रात्री उशिरापर्यंत अनेकांनी जल्लोष साजरा केला. वर्ल्ड कपवर भारताचं नाव कोरल्यानंतर क्रिकेटच्या मैदानातील काही खास क्षण कॅमेरामध्ये टिपण्यात आले आहेत. यातील एक व्हिडीओ विराट कोहलीचा असून तो वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद त्याच्या कुटुंबीयांसोबत शेअर करताना दिसत आहे. वर्ल्ड कपचा अंतिम सामना बार्बाडोसमध्ये पार पडला. यावेळी विराटची पत्नी अनुष्का शर्मा तिथे उपस्थित नव्हती. त्यामुळे या ऐतिहासिक क्षणानंतर विराटने सर्वांत आधी अनुष्काला व्हिडीओ कॉल केला. यावेळी तो मुलगी वामिका आणि मुलगा अकाय यांच्याही बोलताना दिसला. सोशल मीडियावर विराटचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे.
व्हिडीओ कॉलवर बोलताना विराटच्या चेहऱ्यावरील आनंद सहज पहायला मिळतोय. फोनवर बोलताना तो फ्लाइंग किस देतानाही दिसतोय. तर चिमुकल्या अकायशी बोलताना हो आनंदाने हातवारे करताना दिसतोय. मॅचनंतर विराट नेहमीच त्याच्या कुटुंबीयांसोबत आनंद साजरा करताना दिसतो. यावेळीही त्याने थेट मैदानातून पत्नीला व्हिडीओ कॉल केला. विराटचा हाच अंदाज चाहत्यांना खूप आवडतो. टीम इंडियाच्या विजयानंतर सोशल मीडियावर शुभेच्छांचा आणि भावनिक पोस्ट्सचा वर्षाव होऊ लागला. अनुष्कानेही विराटसाठी सोशल मीडियावर अत्यंत खास पोस्ट लिहिली आहे. ‘सर्व खेळाडूंना टीव्हीवर रडताना पाहिल्यानंतर माझ्या मुलीची सर्वांत मोठी चिंता हीच होती की त्या सर्वांना मिठी मारण्यासाठी कोणीतरी असेल का? तर होय.. त्यांना 1.5 अब्ज लोकांनी मिठी मारली. अत्यंत अभूतपूर्व विजय आणि महान कामगिरी. चॅम्पियन्सचं अभिनंदन’, असं तिने लिहिलंय.
पहा व्हिडीओ-
Virat Kohli on a call with his lovely wife Anushka Sharma and his kids. ♥️#INDvSA #INDvsSA #INDvsSA2024 #INDvsSAFinal #INDvSAFinal #ViratKohli𓃵 pic.twitter.com/ooZi57qgb0
— 𝐀𝐧𝐤𝐢𝐭 𝐒𝐡𝐚𝐫𝐦𝐚 𝕏(𝓥𝓲𝓻𝓪𝓽¹⁸ Fan) (@Ankit_S1111) June 29, 2024
बार्बाडोसमध्ये शनिवारी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत टीम इंडियाने टी-20 प्रकारातील दुसरं जगज्जेतेपद पटकावलं. रोहित शर्माचं नेतृत्व, जसप्रीत बुमराची भेदक गोलंदाजी, हार्दिक पांड्या – सूर्यकुमार यादव – अक्षर पटेल – अर्शदीपसारख्या गुणी क्रिकेटपटूंचं योगदान, विराट कोहलीची मोक्याच्या क्षणी केलेली खेळी.. या सर्व घटकांमुळे हा विजय मिळवणं शक्य झालं. भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविड यांना यापेक्षा मोलाची निरोपाची भेट मिळणार नव्हती.