‘जेठालाल’च्या घराबाहेर 25 लोकं हत्यारं, बॉम्ब घेऊन उभे असल्याची अफवा; दिलीप जोशी का म्हणाले, “भलं होऊ दे त्याचं..”
जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी यांच्या जिवाला धोका असल्याचा फोन पोलिसांना आला होता. त्यांच्या घराबाहेर बंदुकं, हत्यारं आणि बॉम्ब घेऊन उभे असल्याची माहिती अज्ञात व्यक्तीने कंट्रोल रुमला दिली होती.
मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी यांच्या जिवाला धोका असल्याचा फोन पोलिसांना आला होता. दिलीप यांच्या घराबाहेर 25 लोकं बंदुकं, हत्यारं आणि बॉम्ब घेऊन उभे असल्याची माहिती एका अज्ञात व्यक्तीने फोनद्वारे नागपूर कंट्रोल रुमला दिली होती. त्यानंतर नागपूर कंट्रोल रुमने शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला अलर्ट केलं. मात्र याविषयी तपास केल्यानंतर ही केवळ अफवा असल्याचं समजलं. याविषयी आता दिलीप जोशी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दिलीप जोशी यांची प्रतिक्रिया
“ही बातमी खोटी आहे. असं काहीच झालं नाही. मला कळत नाही की या अफा कुठून आणि कशा पसरतात? गेल्या दोन दिवसांपासून ही अफवा पसरली आहे आणि ते ऐकून मी चकीत झालोय. ज्याने ही चुकीची बातमी पसरवली आहे, त्याचं भलं होऊ दे. माझ्याबद्दल विचारण्यासाठी मला खूप लोकांचे फोन आले. खूप साऱ्या जुन्या मित्रांचे आणि नातेवाईकांचेही फोन आले”, असं दिलीप जोशी म्हणाले.
नागपूर कंट्रोल रुमला फोन
दिलीप यांच्या घराबाहेर 25 लोक बंदूक, हत्यारं आणि बॉम्ब घेऊन उभे आहेत, असं एका अज्ञात व्यक्तीने फोन करून नागपूर कंट्रोल रुमला सांगितलं. ही माहिती पोलिसांना देणाऱ्या व्यक्तीने त्याचं नाव कटके असं सांगितलं आहे. इतकंच नव्हे तर त्या अज्ञात व्यक्तीने कॉलवर असंही सांगितलं की, त्याने काही लोकांना बोलताना ऐकलं की ते मुकेश अंबानी, अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांचीही घरं बॉम्बने उडवणार आहेत. त्यासाठी 25 लोक शहरात आले आहेत.
नेमकं काय घडलं?
ही माहिती मिळताच नागपूर कंट्रोल रुमने शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला अलर्ट केलं आणि एफआयआर दाखल करण्यास सांगितलं. त्याचसोबत याचा तपास करण्यास सांगण्यात आलं. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासानंतर असं लक्षात आलं की ज्या नंबरवरून नागपूर कंट्रोल रुमला कॉल करण्यात आला होता, तो मुलगा दिल्लीच्या एका सिम कार्ड कंपनीत काम करतो. मात्र त्या व्यक्तीचा यात कोणताही सहभाग नव्हता. त्या मुलाच्या नंबरचा वापर त्याच्या माहितीशिवाय स्पूफ करून एका ॲपद्वारे कॉल करण्यात आला होता. पोलीस आता त्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहे.