‘तारक मेहता..’च्या जेठालालची Shark Tank India 2 मध्ये एण्ट्री; बिझनेसबद्दल ऐकून पोट धरून हसले परीक्षक!
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी यांनी शार्क टँक इंडिया 2 मध्ये एण्ट्री केल्याचं पहायला मिळतंय. जेठालालच्या बिझनेसची कल्पना ऐकून परीक्षकसुद्धा पोट धरून हसत आहेत.
मुंबई: बिझनेस आणि गुंतवणुकीवर आधारित ‘शार्क टँक इंडिया’चा दुसरा सिझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. यात हजेरी लावणारे स्पर्धक आणि त्यांच्या बिझनेस आयडियामुळे सोशल मीडियावर या शोची जोरदार चर्चा होतेय. यादरम्यान ‘शार्क टँक इंडिया 2’चा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होतोय. यामध्ये ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी यांनी शार्क टँक इंडिया 2 मध्ये एण्ट्री केल्याचं पहायला मिळतंय. जेठालालच्या बिझनेसची कल्पना ऐकून परीक्षकसुद्धा पोट धरून हसत आहेत.
शार्क्स समोर जेठालालने त्याच्या बिझनेसची डील सांगितली आहे. गडा इलेक्ट्रॉनिक्स नावाची माझी दुकान असल्याचं त्याने परीक्षकांना सांगितलं आहे. “माझ्या दुकानात कमीत कमी 40 ते 50 लाखांचा माल असेल आणि तेवढाच माल गोदामात आहे”, असं जेठालाल म्हणतो. त्यावर परीक्षक त्याला त्याचा प्रॉडक्ट दाखवण्यास सांगतात.
प्रॉडक्ट दाखवण्याची मागणी करताच जेठालाल म्हणतो, “हा स्पेशल फटाका आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे, हा फटाका फोडल्यावर त्याचा आवाज येत नाही. उलट एक छान संगीत ऐकू येतं आणि ते म्हणतं हॅपी दिवाली.” हे ऐकल्यानंतर जेठालालला त्याच्या प्रॉडक्टची किंमत विचारली जाते. तर एक हजार रुपयाला एक असं तो किंमत सांगतो. हे ऐकून सर्वजण हसू लागतात.
View this post on Instagram
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला शार्क टँक इंडिया 2 चा हा व्हिडीओ खरा नसून एडिट केलेला आहे. या व्हिडीओमध्ये परीक्षक अमन गुप्ता जेठालालला त्याचा व्यवसाय वाढविण्याविषयी बोलतो. तेव्हा जेठालाल त्याला म्हणतो, “अरे जास्त ब्रँड्स आणून काय करायचं आहे? तुम्ही लाखो किंवा कोट्यवधी रुपये कमावले तरी दोन चपात्या खाऊनही पोट भरतं.”
जेठालालचा बिझनेस, त्याच्या बिझनेसची कल्पना आणि डायलॉग्स ऐकून परीक्षकांमध्ये एकच हशा पिकतो. नेटकऱ्यांना हा व्हायरल व्हिडीओ खूपच आवडला आहे. जेठालाल स्वत: एक शार्क आहे, त्याचा बिझनेस कोणीच घेऊ शकत नाही, असे मजेशीर कमेंट्स नेटकरी करत आहेत.