TMKOC | “त्यांनी कुत्र्यासारखी वागणूक दिली”; ‘तारक मेहता..’च्या निर्मात्यांवर आणखी एका अभिनेत्रीचा आरोप
"जेवढा त्रास त्यांनी दिला, तेवढा कोणीच दिला नसेल. कलाकारांना ते कुत्र्यासारखी वागणूक देतात. कार्यकारी निर्माते सोहैल रमाणी हे तर सर्वांत वाईट आहेत. त्यांनी नट्टू काकांचाही अपमान केला होता", अशी तक्रार तिने केली.
मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या काही दिवसांपासून सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. आधी या मालिकेत मिसेस रोशन सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने निर्माते असित कुमार मोदींवर लैंगिक शोषणाची टीका केली. त्यानंतर आता अभिनेत्री मोनिका भदौरियाने सेटवर तिला त्रास दिल्याचा आरोप केला आहे. मोनिकाने या मालिकेत बावरीची भूमिका साकारली होती. 2019 मध्ये तिने ही मालिका सोडली. मात्र मालिका सोडल्यानंतर तीन महिन्यांनीही त्यांनी थकलेलं मानधन दिलं नसल्याचा आरोप तिने केला आहे. “मी वर्षभरापेक्षा जास्त काळ माझ्या पैशांसाठी लढले. त्यांनी प्रत्येक कलाकाराचे पैसे रोखले आहेत. मग तो राज अनाडकत असो, गुरुचरण सिंग.. त्यांच्याकडे पैशांची कमी नाही. पण फक्त त्रास देण्यासाठी त्यांनी पैसे दिले नाहीत”, असं ती म्हणाली.
आईवर कॅन्सरचे उपचार सुरू असताना निर्मात्यांनी साथ न दिल्याची तक्रारही तिने केली आहे. “मी रात्रभर आईसोबत रुग्णालयात असायचे आणि ते पहाटे मला शूटिंगला बोलवायचे. माझी मानसिक स्थिती चांगली नाही असं म्हटल्यावरसुद्धा ते मला बळजबरीने शूटिंगला बोलवायचे. वाईट गोष्ट म्हणजे मी सेटवर फक्त बसून राहायचे, पण मला काहीच काम द्यायचे नाहीत”, असं तिने सांगितलं.
याविषयी ती पुढे म्हणाली, “आईच्या निधनानंतर सात दिवसांतच त्यांनी मला कामावर बोलावलं होतं. मी कामावर रुज होण्याच्या मनस्थितीत नसतानाही ते मला म्हणाले की, “आम्ही तुला पैसे देतोय, आम्ही जेव्हा बोलावू तेव्हा तुला कामावर हजर राहावं लागेल, मग तुझी आई रुग्णालयात असो किंवा नाही.” माझ्याकडे दुसरा कोणता पर्याय नसल्याने मी रोज सेटवर जायचे आणि दररोज रडायचे. सेटवर असित मोदी स्वत:लाच देव समजतात. सेटवर त्यांचीच गुंडगिरी चालते.”
View this post on Instagram
माध्यमांसमोर वाईट बोलू नये यासाठी निर्मात्यांनी करारावर स्वाक्षरी घेतल्याचंही मोनिकाने सांगितलं. “मालिकेत जे लोक काम करतायत, ते वाईट बोलणारही नाहीत. कारण त्यांनी करारावर तशी स्वाक्षरी घेतली आहे. जेनिफरसुद्धा इतर कलाकारांविषयी काही बोलली नाही. जेव्हा तिच्यासोबत त्या गोष्टी घडल्या, तेव्हा ती व्यक्त झाली. सर्वांना नोकरी वाचवायची आहे. जेवढा त्रास त्यांनी दिला, तेवढा कोणीच दिला नसेल. कलाकारांना ते कुत्र्यासारखी वागणूक देतात. कार्यकारी निर्माते सोहैल रमाणी हे तर सर्वांत वाईट आहेत. त्यांनी नट्टू काकांचाही अपमान केला होता”, अशी तक्रार तिने केली.