Aai Kuthe Kay Karte: ‘..तर फार अस्वस्थ होतं’; ‘अरुंधती’ची ही खास पोस्ट चाहत्यांमध्ये चर्चेत
स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत अरुंधतीची (Arundhati) भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) यांचा मोठा चाहतावर्ग आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत अरुंधतीची (Arundhati) भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) यांचा मोठा चाहतावर्ग आहे. मधुराणी या त्यांच्या शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत सोशल मीडियाद्वारे नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. नुकतीच त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी चाहत्यांना एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सुचवलेली कल्पना ही अनेकांना आवडली आहे. आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात आणि सोशल मीडियाने व्यापलेल्या या जगात आपण पुस्तक वाचनावर कितपत भर देतो? मात्र वाचन केलं नाही तर फार अस्वस्थ होतं, अशी भावना मधुराणीने या पोस्टमध्ये व्यक्त केली.
मधुराणीची पोस्ट-
‘मिळेल ती जागा आणि मिळेल तितक्या क्षणांची फुरसत चिमटीत पकडायची आणि जमेल तितकं वाचायचं. भले एक पुस्तक वाचायला महिना लागो पण ते पुरं करायचं. वाचलं नाही काही चांगलं तर फार अस्वस्थ होतं. मी एक शक्कल लढवलेय. सेटवर एक, मी सकाळचा चहा प्यायला बसते तिथे एक आणि बेडवर एक अशी तीन पुस्तक ठेवलेली असतात. तिन्ही वेगवेगळ्या प्रकारची. जमेल तसं दोन पानं कधी चार पण वाचायचं, वाचत राहायचं, असं लिहित मधुराणीने जागतिक ग्रंथ दिनाच्या शुभेच्छा चाहत्यांना दिल्या. यासोबतच त्यांनी सध्या वाचत असलेल्या तीन पुस्तकांची नावंसुद्धा सांगितली. भैरप्पा यांचं मंद्र, अरुणा सबाने यांचं सूर्य गिळणारी मी आणि दीपा देशमुख यांचं जग बदलणारे ग्रंथ.. ही तीन पुस्तकं मधुराणी सध्या वाचत असून तुम्ही काय वाचताय, असा प्रश्नही त्यांनी चाहत्यांना विचारला.
View this post on Instagram
मधुराणी यांच्या या पोस्टवर कमेंट्स करत अनेकांनी वाचनात असलेल्या पुस्तकांची नावं लिहिली. तर काहींना त्यांनी सुचवलेली ही कल्पना खूपच आवडली असून यापुढे ती अमलात आणणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ‘खरंच आम्ही सगळे सेट वर बोलण्यात व्यस्त, टाइमपास करत होतो. पण तुमच्या हातात पुस्तक पाहिलं. एवढ्या सेटवरच्या गोंधळातसुद्धा तुमचं पुस्तकप्रेम आणि एकाग्रता पाहून तुम्हाला मानलं मॅम’, अशी प्रतिक्रिया एका कलाकाराने त्यावर दिली.
हेही वाचा:
Dharmaveer: ‘धर्मवीर’ चित्रपटात एकनाथ शिंदेंची भूमिका साकारणार ‘हा’ अभिनेता; पहा खास लूक