बाप कॅन्सरने गेला… आईला वेड लागलं; ‘बिग बॉस’मध्ये तळपणाऱ्या ‘सूरज’ची व्यथा ऐकून तुम्हालाही रडू येईल
सूरज चव्हाण याचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय राहिलं आहे. तो लहान असतानाच त्याच्या आई-वडिलांचं निधन झालं होतं. सूरजच्या मोठ्या बहिणीने त्याचा सांभाळ केला. सूरज प्रचंड मेहनत करत इथपर्यंत आला आहे. त्याचा हा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे.
बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये 16 नंबरचा स्पर्धक जो आला आहे त्यावरुन प्रचंड चर्चा सुरु आहे. या सीझनमध्ये अनेक रिल्सस्टार्सना संधी देण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूरच्या धनंजय पोवार उर्फ डीपी, कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर आणि टिकटॉकवर सर्व ह्यूजचे रेकॉर्ड मोडणारा सूरज चव्हाण यांचा समावेश आहे. सूरज चव्हाण याच्या बिग बॉसच्या घरातील एन्ट्रीवर चाहत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. कुणी यावरुन टीका करताना दिसतंय, तर कुणाकडून सूरज चव्हाण याचं कौतुक केलं जात आहे. सूरज चव्हाण याला बिग बॉसच्या घरात पहिल्याच दिवशी सर्व स्पर्धकांनी तो निर्णय घेण्यास अकार्यक्षम असल्याचं ठरवलं आहे. पण बिग बॉसच्या घरापर्यंत पोहोचलेल्या सूरच चव्हाणचा प्रवास वाटतो तितका सोपा नाही. त्याने आपल्या आयुष्यात अनेक खस्ता खाल्या आहेत.
सूरज चव्हाण हा मूळचा बारामतीचा आहे. बारामतीमधील मोडवे गाव येथे तो वास्तव्यास आहे. सूरज चव्हाण हा आता लोकप्रिय आणि प्रसिद्धीच्या झोतात आला असला तरी त्याचं वैयक्तिक आयुष्य खूप खडतर राहिलं आहे. सूरजचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. तो लहान असतानाच त्याच्या आई-वडिलांचं निधन झालं होतं. त्याची घरातील परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याला इयत्ता आठवी पर्यंतच शिक्षण घेता आलं होतं. सूरजला पाच बहिणी आहेत. यांपैकी मोठ्या बहिणीने सूरजचा सांभाळ केला.
सूरज मोलमजुरी करायचा. या दरम्यान त्याला टिकटॉक बद्दल समजलं. त्याने सुरुवातीला एक-दोन व्हिडीओ टाकून पाहिले. ते व्हिडीओ व्हायरल झाले. यानंतर सूरजने मेहनत करुन स्वत:च्या हिंमतीवर मोबाईल खरेदी केला. त्यामोबाईलमध्ये त्याने टिकटॉक डाऊनलोड केलं आणि तो व्हिडीओ शेअर करु लागला. त्याच्या व्हिडीओला चांगली प्रसिद्धी मिळाली. त्याचे व्हिडीओ खूप व्हायरल झाले. यामुळे त्याला काही यूट्यूब चॅनलकडून शॉर्ट फिल्मसाठी ऑफर येऊ लागल्या. टिकटॉक बंद झाल्यानंतर सूरजने यूट्यूब चॅनल सुरु केलं. तिथे देखील त्याला लाखो चाहत्यांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे सूरज आज बिग बॉसच्या घरापर्यंत पोहोचू शकला.
सूरजने बिग बॉसच्या घरात दुसऱ्या दिवशी आपल्या इतर स्पर्धकांसोबत बातचित करत असताना आपल्या आयुष्यातील हृदयद्रावक घटना सांगितली. आपल्या आई-वडिलांचं निधन कसं झालं? याबद्दल सूरजने सांगितलं. सूरजच्या वडिलांना कॅन्सर आजाराची लागण झाली होती. त्या आजारातच सूरच्या वडिलांचं निधन झालं होतं. या धक्क्याने सूरजच्या आईची मानसिक संतुलन बिघडलं होतं. त्याच्या आईला रक्ताच्या उलट्या झाल्या आणि त्यातच तिचं निधन झालं, असं सूरज म्हणाला.
सूरज चव्हाण नेमकं काय म्हणाला?
“माझ्या घरातली परिस्थिती प्रचंड वाईट होती. माझ्या वडिलांना कॅन्सर झाला. वडिलांचं त्यामध्ये निधन झालं आणि या सगळ्या धक्क्यातून माझी आई सावरू शकली नाही. या तणावामुळे तिला वेड लागलं…आईला रक्ताच्या उलट्या होत होत्या. तिला खूप त्रास व्हायचा…ती पूर्ण खचून गेली होती. माझी आई अन् आजी एकाच दिवशी वारल्या. दोघींचा जीव एकाच दिवशी गेल्याने त्या सासू-सुनेने एकमेकींना शेवटचं बघितलं सुद्धा नाही. आता माझ्या घरात फक्त आत्या आणि माझ्या सख्ख्या ५ बहिणी आहेत. मला सुरुवातीला अनेक लोकांनी लुटलंय त्यामुळे माझ्या बहिणी फक्त मला सांगतात… तू सुधार मग आम्हाला खूप बरं वाटेल”, असं सूरजने पंढरीनाथ कांबळे, आर्या जाधव, योगिता चव्हाण यांच्यासोबत बोलताना सांगितलं. यावेळी सूरजने आपण किती पैसे कमवतो या विषयी देखील माहिती दिली. “मला आधी दिवसाला ८० हजार मिळायचे…तेव्हा टिकटॉक होतं. आताही मला ३० ते ५० हजार मिळतात. बच्चा बच्चा जानता है ‘गुलीगत धोका’ कोण आहे”, असं सूरज म्हणाला.