टेरेन्सने नोराला चुकीच्या पद्धतीने केला स्पर्श? कोरिओग्राफरने अखेर सांगितलं सत्य
टेरेन्स-नोराच्या व्हायरल व्हिडीओमागील नेमकं सत्य काय?
मुंबई: प्रसिद्ध कोरिओग्राफर टेरेन्स लुईसने (Terence Lewis) त्याच्या एका व्हायरल व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. या व्हिडीओमध्ये तो अभिनेत्री नोरा फतेहीला (Nora Fatehi) चुकीच्या पद्धतीने स्पर्श करताना दिसत आहे. काही वर्षांपूर्वींचा हा व्हिडीओ आहे. ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या रिॲलिटी शोमध्ये ही घटना घडली होती. टेरेन्स या शोचा परीक्षक होता आणि नोरा पाहुणी म्हणून या शोमध्ये हजर झाली होती. सेटवरील टेरेन्स आणि नोराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर त्याला जोरदार ट्रोलिंग करण्यात आली होती.
मनिष पॉलच्या पॉडकास्ट शोमध्ये टेरेन्स म्हणाला, “तो अत्यंत सामान्य प्रसंग होता. शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या पत्नीने शोमध्ये हजेरी लावली होती. त्यांना आम्ही सर्वांनी मिळून नमस्कार करावा, अशी गीता कपूरची इच्छा होती. त्या आठवड्यात मलायकाला कोविडची लागण झाली होती आणि तिची जागा नोराने घेतली होती. शत्रुघ्न सिन्हा यांना आम्ही नमस्कार केला. पण अचानक गीताला वाटलं की हे एवढं पुरेसं नाही. त्यामुळे पुढे तिने जे म्हटलं ते आम्ही केलं. त्यावेळी माझ्या हाताचा स्पर्श नोराला झाला की नाही हेसुद्धा मला आठवत नाही. त्याला खरंच स्पर्श म्हणावा का हेसुद्धा मला माहीत नाही.”
“दोन आठवड्यांआधी नोराने मला तिच्यासोबत डान्स करण्याची विनंती केली होती. मी तिच्यासोबत असं का वागणार? आजूबाजूला चार कॅमेरे लावलेले आहेत, अशा वेळी कोण अशा पद्धतीने वागणार? हे खूपच घाणेरडं आहे, कोणीच असं करू शकत नाही. मला अनेकांनी शिवीगाळ केले, मेसेजवर धमक्या दिल्या”, असं तो पुढे म्हणाला.
काही नेटकऱ्यांनी तो व्हिडीओ इतका झूम केला की त्यात मी नोराला स्पर्श करतोय असं दिसतंय. पण ते खरं नाहीये, असं टेरेन्सने स्पष्ट केलं. “नोरासोबत मी याआधीही डान्स केला होता. आमचं संपूर्ण लक्ष आमच्या कामावर होतं. जे सोशल मीडियावर दाखवलं गेलं, कॅमेरासमोर असं काही वागण्यासाठी खूप मोठी हिंमत लागते”, अशा शब्दांत टेरेन्सने स्वत:चा बचाव केला.
व्हायरल व्हिडीओ हा मॉर्फ्ड होता, असं स्पष्टीकरण टेरेन्सने 2020 मध्येही दिलं होतं. त्या व्हिडीओवरून टेरेन्सवर नेटकऱ्यांकडून खूप टीका झाली होती.