The Kerala Story | ‘पैसे कमवाल पण इज्जत नाही’ म्हणणाऱ्याला ‘द केरळ स्टोरी’ फेम अभिनेत्रीने दिलं चोख उत्तर
नुकताच हा चित्रपट जवळपास 40 देशांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. देशभरात आतापर्यंत (10 दिवसांत) या चित्रपटाने जवळपास 136.74 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
मुंबई : ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम मोडतोय. 5 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या नऊ दिवसांत 100 कोटींचा आकडा पार केला आहे. बॉक्स ऑफिसच्या या आकड्यांवरून स्पष्ट होतंय की देशभरात सुरू असलेल्या वादाचा चित्रपटाला चांगलाच फायदा होतोय. कमाईचा 100 कोटींचा आकडा पार झाल्यानंतर मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री अदा शर्माने सोशल मीडियावर पोस्ट लिहित आनंद व्यक्त केला. आता तिने ‘द केरळ स्टोरी’ला प्रचारकी म्हणणाऱ्या एका ट्विटर युजरला सडेतोड उत्तर दिलं आहे. या चित्रपटात अदासोबतच योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बलानी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
ट्विटरवर एका व्यक्तीने लिहिलं, ‘असे प्रचारकी चित्रपट बनवून तुम्ही पैसे कमावू शकता, पण इज्जत नाही.’ त्यावर अदा शर्माने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ‘मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे. तुमचे आभार! मला आता फक्त भारतातूनच नाही तर जगभरातून इतकी इज्जत दिल्याबद्दल’, असं लिहित तिने हृदयाचा आणि हसण्याचा इमोजी पोस्ट केला आहे. नुकताच हा चित्रपट जवळपास 40 देशांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. देशभरात आतापर्यंत (10 दिवसांत) या चित्रपटाने जवळपास 136.74 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
अदा शर्माचं ट्विट-
I completely agree ❤️ thank you! mujhe ab sirf India se hi nahi ,world over se itni izzat dene ke liye ❤️? https://t.co/nEsalxKzJc
— Adah Sharma (@adah_sharma) May 14, 2023
सुदिप्तो सेन दिग्दर्शित या चित्रपटाने अवघ्या 9 दिवसांत 112.99 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर याच चित्रपटाची जादू पहायला मिळतेय. केरळमधील हिंदू आणि ख्रिश्चन तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचं धर्मांतर करून कशा पद्धतीने दहशतवादात सामील करून घेतलं, याविषयीची कथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. देशभरात या चित्रपटातून वादही सुरू आहे आणि त्याचवेळी चित्रपटाचं कौतुकसुद्धा होत आहे. 2023 या वर्षात आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपैकी ‘द केरळ स्टोरी’ हा 100 कोटींची कमाई करणार चौथा चित्रपट ठरला आहे.
2023 मध्ये आतापर्यंत कमाईचा 100 कोटींचा आकडा पार करणारे चित्रपट
1- पठाण (जानेवारी) 2- तू झुठी मैं मक्कार (मार्च) 3- किसी का भाई किसी की जान (एप्रिल) 4- द केरळ स्टोरी (मे)