काही राज्यांमधील बंदीनंतरही The Kerala Story चा विक्रम; अवघ्या 12 दिवसांत कमावले इतके कोटी रुपये
केरळमधील हिंदू आणि ख्रिश्चन तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचं धर्मांतर करून कशा पद्धतीने दहशतवादात सामील करून घेतलं, याविषयीची कथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे.
मुंबई : अदा शर्माची मुख्य भूमिका असलेला ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट दुसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करतोय. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या कमाईनेही सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. मात्र आता ‘द केरळ स्टोरी’ने विवेक अग्निहोत्रींच्या ‘द काश्मीर फाइल्स’लाही मागे टाकलं आहे. देशभरात चित्रपटावरून वाद सुरू असतानाही मोठा प्रेक्षकवर्ग थिएटरकडे ओढला जात आहे. ज्या चित्रपटावरून वाद झाला असेल, तो बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसतो. ‘द केरळ स्टोरी’बद्दलही हेच घडतंय.
या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्याच्या सोमवारीही दुहेरी आकड्यांत कमाई केली आहे. पहिल्या आठवड्यातील सोमवारपेक्षा ही कमाई अधिक होती. 5 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या 12 दिवसांत कमाईचा 150 कोटींचा टप्पा पार केला आहे.
‘द केरळ स्टोरी’ची दुसऱ्या वीकेंडची कमाई-
शुक्रवार- 12.35 कोटी रुपये शनिवार- 19.50 कोटी रुपये रविवार- 23.75 कोटी रुपये सोमवार- 10.30 कोटी रुपये मंगळवार- 9.80 कोटी रुपये एकूण- 156.84 कोटी रुपये
अवघ्या 40 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली आहे. येत्या काही दिवसांत हा चित्रपट 200 कोटींचाही टप्पा पार करू शकतो, असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषक वर्तवत आहेत. असं झाल्यास शाहरुख खानच्या ‘पठाण’नंतर हा चित्रपट या वर्षी सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरेल.
#TheKeralaStory is not slowing down soon… Hits double digits on [second] Mon, HIGHER than [first] Mon – ₹ 10.03 cr… All set to cross ₹ 150 cr today [second Tue]… [Week 2] Fri 12.35 cr, Sat 19.50 cr, Sun 23.75 cr, Mon 10.30 cr. Total: ₹ 147.04 cr. #India biz. #Boxoffice pic.twitter.com/yJ7V8dpQuV
— taran adarsh (@taran_adarsh) May 16, 2023
केरळमधील हिंदू आणि ख्रिश्चन तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचं धर्मांतर करून कशा पद्धतीने दहशतवादात सामील करून घेतलं, याविषयीची कथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. देशभरात या चित्रपटातून वादही सुरू आहे आणि त्याचवेळी चित्रपटाचं कौतुकसुद्धा होत आहे. 2023 या वर्षात आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपैकी ‘द केरळ स्टोरी’ हा 100 कोटींची कमाई करणारा चौथा चित्रपट ठरला आहे.
या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बलानी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. त्याविरोधात निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. या संदर्भात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांच्या खंडपीठाने चित्रपटावर बंदी घालण्याचं कारण काय, अशी विचारणा करणारी नोटीस शुक्रवारी बजावली होती. त्यावर दोन्ही राज्यांकडून उत्तर देण्यात आलं आहे.