The Kerala Story पहायचा की नाही? अजूनही या विचारात असाल तर कमाईचा आकडा एकदा पहाच!
केरळमधल्या तीन मुलींची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी या तिघींचं आधी ब्रेनवॉश केलं जातं. नंतर त्यांना ब्लॅकमेल करून बळजबरीने ISIS या दहशतवादी संघटनेत सामील केलं जातं.
मुंबई : देशभरात वाद सुरू असतानाही बॉक्स ऑफिसवर ‘द केरळ स्टोरी’ची दमदार कमाई सुरू आहे. 5 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला सात दिवस पूर्ण झाले आहेत. गेल्या सात दिवसांत ‘द केरळ स्टोरी’ला प्रेक्षक-समिक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. काही राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे तर काही राज्यांमध्ये चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र या गोष्टींचा कमाईवर फारसा परिणाम झाला नाही. ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट 100 कोटी क्लबमध्ये समाविष्ट होण्यापासून काही पावलंच दूर आहे.
‘द केरळ स्टोरी’ने सातव्या दिवशी 12.50 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. गेल्या सात दिवसांत चित्रपटाने 81.36 कोटी रुपये कमावले आहेत. त्यामुळे हा चित्रपट 100 कोटींपासून काही पावलंच दूर आहे. येत्या 2-3 दिवसांत हा टप्पा पार करण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
द केरळ स्टोरीची आतापर्यंतची कमाई-
शुक्रवार- 8.03 कोटी रुपये शनिवार- 11.22 कोटी रुपये रविवार- 16.40 कोटी रुपये सोमवार- 10.07 कोटी रुपये मंगळवार- 11.14 कोटी रुपये बुधवार- 12 कोटी रुपये गुरुवार- 12.50 कोटी रुपये एकूण- 81.36 कोटी रुपये
#TheKeralaStory puts up a PHENOMENAL TOTAL in Week 1… Day-wise biz – especially on weekdays – is an EYE-OPENER… Fri 8.03 cr, Sat 11.22 cr, Sun 16.40 cr, Mon 10.07 cr, Tue 11.14 cr, Wed 12 cr, Thu 12.50 cr. Total: ₹ 81.36 cr. #India biz. Nett BOC. BLOCKBUSTER. #Boxoffice… pic.twitter.com/xLGwso0XCO
— taran adarsh (@taran_adarsh) May 12, 2023
‘द केरळ स्टोरी’ने पहिल्या वीकेंडला 35.65 कोटी रुपये कमावले होते. आता दुसऱ्या वीकेंडला कमाईचा आकडा आणखी वाढणार असल्याचं म्हटलं जातंय. त्याचप्रमाणे पुढील काही दिवसांत चित्रपटाची एकूण कमाई 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त होऊ शकते, असाही अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने वर्तवला आहे.
या चित्रपटातील अभिनेत्री अदा शर्माच्या अभिनयाचं खूप कौतुक होत आहे. केरळमधल्या तीन मुलींची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी या तिघींचं आधी ब्रेनवॉश केलं जातं. नंतर त्यांना ब्लॅकमेल करून बळजबरीने ISIS या दहशतवादी संघटनेत सामील केलं जातं.
केरळ हायकोर्टाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कोणत्याही विशिष्ट समुदायाबद्दल आक्षेपार्ह असं काहीच न दाखवल्याने कोर्टाने स्थगिती देण्यास नकार दिला. त्याचप्रमाणे सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाचं परीक्षण करून त्याला सर्टिफिकेट दिल्याने थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यासाठी तो योग्य असल्याचं कोर्टाने नमूद केलं आहे. या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इनानी आणि सोनिया बिहानी यांच्या मुख्य भूमिका आहेत.