The Kerala Story | निर्मात्यांनी केलेले दावे फुस्स! चित्रपटातील 3 तरुणींसोबत ते घडलंच नाही जे सांगण्यात आलं होतं
'द केरळ स्टोरी' या चित्रपटात अभिनेत्री अदा शर्मा मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात तिने शालिनी उन्नीकृष्णन नावाच्या एका हिंदू तरुणीची भूमिका साकारली आहे. तिच्यासोबत सिद्धी इदनानी (गीतांजली) आणि योगिता बिहानी (नीमा) यांचीसुद्धा कथा दाखवण्यात आली आहे.
मुंबई : बऱ्याच वादानंतर सुदीप्नो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट अखेर आज देशभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी प्रमोशनदरम्यान आणि टीझरमध्ये असा दावा करण्यात आला होता की केरळमधून गायब झालेल्या 32 हजार मुलींची ही कथा आहे. या मुलींचं ब्रेनवॉश करून त्यांचं कशा पद्धतीने धर्म परिवर्तन करण्यात आलं आणि केरळमधून गायब करून त्यांना ISIS या दहशतवादी संघटनेत कशाप्रकारे सामील करण्यात आलं, याची कथा चित्रपटात दाखवण्यात आल्याचं म्हटलं गेलंय. मात्र जेव्हा ट्रेलर प्रदर्शित झाला, तेव्हा मुलींचा हा आकडा 32 हजारवरून थेट 3 करण्यात आला होता. फक्त तीन मुलींची ही कथा असल्याचं म्हटलं गेलं होतं. निर्मात्यांनी प्रदर्शनापूर्वी लव्ह-जिहाद, धर्म परिवर्तन, दहशतवाद असे जे काही दावे केले होते, तेच चित्रपटात दाखवण्यात आलं आहे का, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. मात्र या चित्रपटात नेमकं काय दिसलं, ते जाणून घेऊयात..
तीन मुलींसोबत काय काय घडलं?
‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटात अभिनेत्री अदा शर्मा मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात तिने शालिनी उन्नीकृष्णन नावाच्या एका हिंदू तरुणीची भूमिका साकारली आहे. तिच्यासोबत सिद्धी इदनानी (गीतांजली) आणि योगिता बिहानी (नीमा) यांचीसुद्धा कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाच्या सुरुवातीला आणि कथेच्या केंद्रस्थानी शालिनीच आहे. तिला प्रेमाच्या जाळ्यात फसवलं जातं. शालिनी गरोदर होते आणि त्यानंतर तिचा निकाह होतो. शालिनीची फसवणूक करून तिला सीरियामध्ये पाठवलं जातं, जिथे ती ISIS या दहशतवादी संघटनेत सामील होते.
या चित्रपटाच्या कथेतील दुसरी मुलगी आहे गीतांजली. या चित्रपटात असं दाखवण्यात आलं आहे की गीतांजली एका मुस्लीम तरुणाच्या प्रेमात पडते. त्यानंतर ती इस्लाम धर्म स्वीकारते. मात्र ती त्या मुलासोबत लग्न करत नाही. लग्नाला नकार दिल्यानंतर ती पुन्हा हिंदू धर्मात परत येते. यानंतर सापळा रचून तिचे काही फोटो लीक केले जातात आणि त्यामुळे ती स्वत:चं आयुष्य संपवते.
या कथेतील तिसरी मुलगी आहे नीमा. नीमा ही ख्रिश्चन मुलगी आहे. चित्रपटात ती इस्लाम धर्म स्वीकारत नाही. तिला धर्म बदलण्याची गरज आहे, ही गोष्ट ती मानण्यास तयार नसते. मात्र धर्म परिवर्तनासाठी तिला बळजबरी करण्यात येते. चित्रपटात तिच्यावर सामूहिक बलात्कार होत असल्याचंही दाखवलं गेलंय. मात्र या सर्व समस्यांचा सामना केल्यानंतरही नीमा तिच्या धर्म न बदलण्याच्या निर्णयावर ठाम राहते.
निर्मात्यांचा दावा आणि चित्रपटातील सत्य
म्हणजेच चित्रपटातील तीन मुलींपैकी एकच मुलगी सीरियाला पोहोचते. इतर दोन मुलींवर धर्म परिवर्तनाची सक्ती केली जाते. मात्र त्यातील एक मुलगी तिच्या धर्मात परत येते. तिघींपैकी एकच मुलगी ही मुस्लीम तरुणाशी लग्न करते. केरळमधल्या या मुली गायब झाल्याचा दावा निर्मात्यांनी केला होता, मात्र चित्रपटात तिघींपैकी फक्त एकच मुलगी गायब होते.