या अभिनेत्रीवर आली भीक मागायची वेळ; चोरी करतानाही झाली अटक, अखेर मनोरुग्णालयात करावं लागलं दाखल
भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीत काम केल्यानंतर या अभिनेत्रीने मुंबई गाठली. मात्र मुंबईत तिची स्वप्नं पूर्ण होऊ शकली नाही. हाती काम नसल्याने अखेर तिने रस्त्यावर भीकसुद्धा मागितली. एकेदिवशी चोरी करताना तिला पोलिसांनी अटक केली आणि त्यानंतर तिला मनोरुग्णालयात दाखल केलं गेलं.
मुंबई : 27 ऑक्टोबर 2023 | सिनेसृष्टीत अनेक कलाकार आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. असंख्य स्वप्नं उराशी बाळगून हे कलाकार कठोर मेहनत करतात. यात काहींना यश मिळतं, तर काहींची स्वप्नं अपुरीच राहतात. यात काही असेही कलाकार आहेत, ज्यांनी सिनेसृष्टीत सुरुवातीला नाव कमावलं. मात्र ठराविक काळानंतर ते बेरोजगार झाले. या बेरोजगारीमुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली. अशाच एका अभिनेत्रीचं नाव आहे मिताली शर्मा. मिताली ही भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीत लोकप्रिय अभिनेत्री होती. मात्र नंतर तिचं आयुष्य इतकं बदललं की जगण्यासाठी तिला भीक मागावी लागली.
मितालीचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होऊ लागले आणि त्यानंतर तिचं पूर्ण आयुष्यच बदललं. तिला बऱ्याच काळापर्यंत कामच मिळालं नाही. काही चित्रपट आणि मॉडेलिंग केल्यानंतर तिने कामासाठी मुंबई गाठली. मुंबईत येऊन सिनेसृष्टीत काम मिळेल अशी तिला आशा होती. मात्र प्रत्यक्षात वेगळंच घडलं. तिला मुंबईत आल्यानंतरही हाती काम मिळालं नाही. यामुळे ती नैराश्यात गेली. काही काळानंतर ती मुंबईतील रस्त्यांवर भीक मागतानाही दिसली. इतकंच नव्हे तर तिने चोरीचाही प्रयत्न केला. त्यानंतर तिला अटक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिला पोलीस अधिकारीलाही तिने शिवीगाळ केली.
बिहारहून मुंबईला आल्यानंतर मितालीच्या कुटुंबीयांनी तिच्याशी संपर्क तोडला. बेरोजगारी, आर्थिक नुकसान, हलाखीची परिस्थिती आणि सोबत कुटुंब किंवा मित्रमैत्रिणींची साथ नसल्याने मितालीच्या मानसिक स्वास्थ्यावर खूप परिणाम झाला. अखेर तिला पोलिसांनी ठाण्यातील मनोरुग्णालयात दाखल केलं. मिताली शर्मा सध्या कुठे आहे आणि काय करते, याची कोणतीच माहिती नाही.
बॉलिवूड किंवा सिनेसृष्टीत यश संपादित करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. हेच स्वप्न उराशी बाळगून असंख्य कलाकार मायानगरी मुंबई गाठतात. मात्र इथे प्रत्येकालाच अपेक्षित यश मिळत नाही. अशावेळी काहीजण जगण्याचा वेगळा मार्ग शोधतात, तर काहींना त्या परिस्थितीतून वर येण्यास फार वेळ लागतो. मितालीसोबतही असंच काहीसं घडलं. सोबत कुटुंबीय किंवा मित्रपरिवार नसल्यानेही तिने आत्मविश्वास गमावला आणि नैराश्याची शिकार झाली.