Tu Jhoothi Main Makkaar Review | कसा आहे रणबीर – श्रद्धाचा चित्रपट? तिकिट बुक करण्याआधी वाचा रिव्ह्यू
तू झूठी मैं मक्कार हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट असून त्यात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने हे दोघं पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. यामध्ये डिंपल कपाडियाचीही भूमिका आहे.
मुंबई : अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांचा ‘तू झूठी मैं मक्कार’ हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने रणबीर आणि श्रद्धा पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर या जोडीची केमिस्ट्री हिट ठरणार की फ्लॉप हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. चित्रपटात रणबीर आणि श्रद्धासोबतच डिंपल कपाडिया, बोनी कपूर, अनुभव सिंह बस्सी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पहावा की पाहू नये या संभ्रमात असाल तर त्याआधी हा रिव्ह्यू वाचा..
चित्रपटाची कथा
ही कहाणी आहे मिक्की (रणबीर) आणि टिन्नीची (श्रद्धा). रोहन अरोरा ऊर्फ मिक्की हा दिल्लीत त्याच्या कुटुंबीयांसोबत राहतो. त्याच्या कुटुंबात आजी, वडील (बोनी कपूर), आई (डिंपल कपाडिया) यांच्याशिवाय बहीण, भाची, भावोजी आणि त्याचा मित्र (अनुभव सिंह बस्सी) यांचा सहभाग आहे. या मित्रासोबत तो फॅमिली बिझनेससाठी काम करत असतो. त्याचसोबत दोघं मित्र मिळून बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडचं ब्रेकअप करण्याचाही कॉन्ट्रॅक्ट घेतात. समोरच्या व्यक्तीचं मन न दुखावता कसं ब्रेकअप करता येईल, यासाठी तो काम करत असतो. तर दुसरीकडे निशा ऊर्फ टिन्नी ही नोकरीसाठी दिल्लीत राहते. आपल्या कुटुंबापासून वेगळी राहणारी टिन्नी ही आत्मनिर्भर आणि हल्लीच्या काळातील मुलगी आहे. आता झूठी टिन्नी आणि मक्कार मिक्की या दोघांचा जेव्हा आमनासामना होईल, तेव्हा काय घडेल याची कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे.
कसा आहे चित्रपट?
लव रंजनच्या या चित्रपटात आठ गाणी आहेत. जसजशी या चित्रपटाची कथा पुढे जाते, तसतशी ही गाणी आणखी मजेशीर वाटतात. मात्र होळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात होळीशी संबंधित एकही गाणं नाही. लव रंजनचा चित्रपट आणि मोनोलॉग हे जणू समीकरणच आहे. मध्यांतरापूर्वी या चित्रपटात काही अनावश्यक आणि रटाळवाणे मोनोलॉग आहेत. मध्यांतरानंतर चित्रपटातील एंटरटेन्मेंटचा डोस डबल होतो. यामध्ये कार्तिक आर्यन आणि नुशरत भरूचा यांची खास एण्ट्रीसुद्धा पहायला मिळते.
आजच्या काळातील फॅमिली ड्रामा
या चित्रपटात दाखवलेलं अरोरा कुटुंब हे आजच्या काळातील कुटुंबाप्रमाणे आहे. त्यामुळे तरुणाईला ही कथा आवडू शकते. तू झूठी मैं मक्कारची कथा तितकीच ताजीतवानी आहे. रणबीर – श्रद्धाच्या अभिनयासोबतच त्यांची केमिस्ट्रीसुद्धा कमाल आहे. या चित्रपटात पुन्हा एकदा रणबीरचा चार्मिंग लूक पहायला मिळतो. याशिवाय डिंपल कपाडिया यांनी आपल्या दमदार अभिनयाने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. स्टँडअप कॉमेडियन अनुभव सिंह बस्सीचा हा पहिलाच चित्रपट आहे. मात्र त्याने त्याच्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे.म
अभिनय, दिग्दर्शन आणि कथा
हा एक परफेक्ट लव रंजन चित्रपट आहे. खळखळून हसवतानाच हा चित्रपट तुम्हाला कधी भावूक करेल, हे कळणार नाही. मोनोलॉग आणि इतर संवाद यांमुळे कथा आणखी मजबूत वाटते. या चित्रपटाचा क्लायमॅक्स सर्वांत मजेशीर आहे. बऱ्याच काळानंतर बॉलिवूडमध्ये असा रोमँटिक कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. जर तुम्ही रणबीरचा जुना अंदाज मिस करत असाल, तर हा चित्रपट तुम्हाला नक्की आवडेल.