महेश मांजरेकरांच्या ‘वीर दौडले सात’ चित्रपटात ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील अभिनेत्रीची वर्णी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांच्या उपस्थितीत या चित्रपटाची घोषणा झाली. तेव्हापासून हा चित्रपट विविध कारणांमुळे सतत चर्चेत आहे. या चित्रपटात अक्षय कुमार हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.
मुंबई: गेल्या वर्षी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ‘वीर दौडल सात’ या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांच्या उपस्थितीत या चित्रपटाची घोषणा झाली. तेव्हापासून हा चित्रपट विविध कारणांमुळे सतत चर्चेत आहे. या चित्रपटात अक्षय कुमार हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. डिसेंबर 2022 मध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली. आता या चित्रपटात एका प्रसिद्ध अभिनेत्रीची वर्णी लागल्याची माहिती समोर येत आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत वहिनीसाहेबांची भूमिका साकारणारी माधुरी पवार या ऐतिहासिक चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.
‘महाराष्ट्राची महाअप्सरा’ अशी माधुरी पवारची ओळख आहे. तिने आपल्या अदाकारीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. ‘वहिनीसाहेब’ ही व्यक्तिरेखा असो किंवा ‘रानबाजार’ या वेब सीरिजमधील प्रेरणा सयाजीराव पाटील सानेची भूमिका असो.. माधुरीने तिच्या वैविध्यपूर्ण अभिनयाने प्रेक्षक आणि समिक्षकांची दाद मिळवली आहे. ती उत्तम नृत्यांगनासुद्धा आहे.
साचेबद्ध भूमिका न करता चौकटीबाहेरच्या भूमिका स्वीकारत माधुरीने तिच्या क्षमता सिद्ध केल्या आहेत. आता महेश मांजरेकर यांच्या ‘वीर दौडले सात’ या ऐतिहासिक चित्रपटात ती महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात माधुरीची नेमकी कोणती व्यक्तिरेखा असेल हे जाणून घेण्यासाठी मात्र प्रेक्षकांना अद्याप काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
View this post on Instagram
अक्षय कुमार साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका
“मला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका ही राज ठाकरेंमुळे मिळाली. त्यांनी मला आश्वासन दिलं की तू ही भूमिका साकारू शकतोस. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. या भूमिकेसाठी मी माझं सर्वस्व अर्पण करेन”, असं वक्तव्य अक्षयने चित्रपटाच्या घोषणेदरम्यान केलं होतं.
या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर त्यावरून खूप मोठा वाद निर्माण झाला होता. या चित्रपटात चुकीचे संदर्भ असून चुकीची नावं, तसंच मावळ्यांची वेशभूषादेखील चुकीची असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनीसुद्धा या चित्रपटाला विरोध दर्शवला होता.
चित्रपटात अक्षय कुमारसोबत जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, विशाल निकम, विराट मडके, हार्दीक जोशी, सत्या, अक्षय, नवाब खान आणि प्रवीण तरडे यांच्याही भूमिका आहेत. महेश मांजरेकर दिग्दर्शित हा चित्रपट 2023 मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू अशा चार भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.