“बरेच इंजेक्शन्स घेतले, वजन वाढलं”; एग्ज फ्रिजिंगबद्दल अभिनेत्रीने सांगितला अनुभव
रिधिमा पंडितशिवाय याआधी इतरही काही अभिनेत्रींनी एग्ज फ्रिज केले आहेत. यात मोना सिंग, नेहा पेंडसे यांचाही समावेश आहे. 28 ते 30 वर्षांचे असाल तेव्हाच एग्ज फ्रिज करा, असा सल्ला नेहा पेंडसेने दिला होता.
मुंबई : 19 मार्च 2024 | वाढत्या वयानुसार महिलांवर गरोदरपणाचा दबावही वाढत जातो. अशातच अनेकजण हल्ली एग्ज फ्रिजिंगचा पर्याय निवडत आहेत. ‘बहु हमारी रजनीकांत’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रिधिमा पंडित नुकतीच याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. रिधिमा आता 33 वर्षांची असून नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने एग्ज फ्रिजिंगचा आपला अनुभव सांगितला. रिधिमाने सांगितलं की जेव्हा एग्ज फ्रिजिंगची प्रक्रिया सुरू होती, तेव्हा ती शूटिंगमध्ये व्यस्त असायची. यामुळे तिला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. इंजेक्शनमुळे तिच्या शरीरावर परिणाम झाला आणि ही संपूर्ण प्रक्रिया दमछाक करणारी असते, असं तिने म्हटलंय.
याविषयी रिधिमा म्हणाली, “महिलांचं बायोलॉजिकल क्लॉक असतं आणि ते प्रत्येक दिवसागणिक टिक-टिक पुढे जातंच असतं. वयोमानानुसार आपल्या एग्जची गुणवत्ता आणि प्रमाण कमी होत जातं. याविषयीची मला चांगलीच माहिती होती. म्हणूनच मी एग्ज फ्रिजिंगचा निर्णय घेतला. मात्र ही संपूर्ण प्रक्रिया शारीरिकदृष्ट्या दमछाक करणारी आहे. हे सर्व म्हणावं तितकं सोपं नाही. आपल्याला बरेच इंजेक्शन्स घ्यावे लागतात. त्यामुळे ब्लोटिंग होते आणि वजनही वाढतं. नंतर या समस्या कमी होत जातात. हार्मोनल प्रक्रियेनंतर काही शारीरिक बदलांना सामोरं जावं लागतं.”
View this post on Instagram
लग्नाविषयी बोलताना रिधिमा पुढे म्हणाली, “मी भविष्यात कोणाशी लग्न करेन मला माहित नाही. मला योग्य जोडीदार मिळेल की नाही यावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत. गेल्या काही वर्षांत अनेक महिलांनी एग्ज फ्रिजिंगचा पर्याय निवडला आहे. ती प्रक्रिया झाल्याने आता मी गरोदरपणाबद्दल निश्चिंत झाले आहे.”
रिधिमाच्या आधी इतरही बऱ्याच अभिनेत्रींनी एग्ज फ्रिजिंगचा पर्याय निवडला आहे. ‘जस्सी जैसी कोई नहीं’ फेम अभिनेत्री मोना सिंग, ‘भाभीजी घर पर है’ फेम अभिनेत्री नेहा पेंडसे यांनीही एग्ज फ्रिज केले आहेत. आपल्या या निर्णयाबद्दल बोलताना नेहा म्हणाली होती “आपल्या समाजात बऱ्याच महिलांना आई बनण्याविषयीच्या निर्णयाबद्दल विचारलं जात नाही. मातृत्वाच्या गोष्टी त्यांच्यावर फक्त थोपवल्या जातात. सुदैवाने माझ्या कुटुंबात असं काही नाही. आई कधी व्हावं याचा पूर्णपणे निर्णय मी माझ्या इच्छेनुसार घेऊ शकते. त्याला कुटुंबीयांचाही पाठिंबा आहे.”