Urfi Javed: चित्रा वाघ यांच्यासोबत वाद; उर्फी जावेद राष्ट्रवादीच्या ‘या’ मोठ्या महिला नेत्याची घेणार भेट
उर्फी जावेदच्या कपड्यांवरून सुरू झालेला वाद अद्याप शमला नाही. सुरुवातीला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीवर टीका करत तिच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. उर्फीवरून चित्रा यांनी राज्य महिला आयोगालाही प्रश्न विचारले.
मुंबई: अभिनेत्री उर्फी जावेदच्या कपड्यांवरून सुरू झालेला वाद अद्याप शमला नाही. सुरुवातीला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीवर टीका करत तिच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. उर्फीवरून चित्रा यांनी राज्य महिला आयोगालाही प्रश्न विचारले. तेव्हा महिला आयोगाने चित्रा वाघ यांना नोटीस बजावली. या नोटिशीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असताना आता उर्फी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भेट घेणार आहे. आज (शुक्रवारी) उर्फी महिला आयोगाच्या कार्यालयात जाऊन अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भेट घेणार आहे. या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
तोकडे कपडे घालणाऱ्या उर्फी जावेदवरून चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाला प्रश्न विचारले. त्यानंतर महिला आयोगाने चित्रा वाघ यांना नोटीस बजावली होती. या नोटिशीला उत्तर देताना त्यांनी चाकणकर यांच्यावर निशाणा साधला होता. “मला असे 56 नोटीस रोज येत असतात. त्यात अजून एक आली. त्यात विशेष असं काही नाही आणि त्याचं उत्तरसुद्धा मी दिलेलं आहे. माझा आक्षेप आयोगावर नाही, तर अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर आहे”, असं चित्रा वाघ म्हणाल्या होत्या.
रुपाली चाकणकर यांचा पलटवार
“त्यांना पाठवलेली नोटीस त्यांनी नीट वाचली असती, तर हे प्रश्न त्यांना पडले नसते. त्याबद्दलचा अभ्यास थोडा कमी असल्याने हे प्रश्न विचारले गेले असतील. समाजामध्ये खोटी माहिती पसरवून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला आहे, त्याविषयी ही नोटीस बजावली आहे”, असा पलटवार चाकणकर यांनी केला होता.
दुसरीकडे उर्फी तिच्या ट्विटर अकाऊंटवरून चित्रा वाघ यांच्याबद्दल काही पोस्ट लिहित आहे. तिचे हे ट्विट्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ‘चित्रा ताई मेरी खास है, फ्युचर मे होनेवाली सास है’, ‘उर्फी जावेदला दिला त्रास, चित्रा अशी कशी गं तू सास’ असे ट्विट्स उर्फी करत आहे.