Urfi Javed | ‘इतक्या खालच्या पातळीला जाऊन..’; कुस्तीपटू आंदोलकांच्या ‘त्या’ फोटोंवर भडकली उर्फी जावेद
आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी जंतर-मंतरवरील तंबू उखडून टाकले. आंदोलकांनी आणलेल्या गाद्या, चटया, कुलर, पंखे, ताडपत्री आणि इतर साहित्यही बाजूला केले आणि संध्याकाळपर्यंत आंदोलन पूर्णपणे मोडून काढलं.
मुंबई : नव्या संसद भवनाच्या ऐतिहासिक उद्घाटन सोहळ्यापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर जंतर-मंतर इथं सुरू असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाची रविवारी हिंसक पद्धतीने सांगता झाली. महिला महापंचायत भरविण्यासाठी संसद भवनाकडे निघालेल्या कुस्तीपटूंची पोलिसांनी धरपकड केली. त्यांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर जंतर-मंतर इथलं सर्व साहित्य पोलिसांनी जप्त केलं. ऑलिम्पिक विजेते कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक, संगीता फोगट तसंच विनेश फोगट यांच्यासह आंदोलनाच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी आता उर्फी जावेदचं एक ट्विट चर्चेत आलं आहे. संगीता फोगट आणि विनेश फोगट यांचा मॉर्फ केलेला फोटो पोस्ट करत उर्फीने संताप व्यक्त केला आहे.
संगीता आणि विनेश यांचा हा फोटो पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरचा आहे. एका फोटोमध्ये त्यांचे गंभीर चेहरे पहायला मिळत आहेत. तर मॉर्फ केलेल्या फोटोमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसतंय. हे दोन्ही फोटो शेअर करत उर्फीने लिहिलं, ‘आपला खोटारडेपणा सिद्ध करण्यासाठी लोक असे फोटो का एडिट करतात? एखाद्याला चुकीचं ठरविण्यासाठी इतक्या खालच्या पातळीला जाऊ नये की खोटेपणाचा आधार घ्यावा लागेल.’
Why do people edit photos like this to prove their lies ! Kisi ko Galat thehrane k Liye itna nahi girna chahiye k jhoot ka sahara liya jaaye pic.twitter.com/PVS7b1bJtT
— Uorfi (@uorfi_) May 28, 2023
महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेले राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांना अटक करण्याच्या मागणीसाठी रविवारी नव्या संसद भवनाबाहेर महापंचायत भरविण्याचा निर्णय कुस्तीपटूंनी घेतला होता. मात्र संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यात कोणतीही बाधा येऊ नये, याची दक्षता घेत पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली. तरीही रविवारी दुपारी जंतर-मंतरभोवती असलेली नाकाबंदी तोडून आंदोलकांनी संसदेकडे कूच करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली.
आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी जंतर-मंतरवरील तंबू उखडून टाकले. आंदोलकांनी आणलेल्या गाद्या, चटया, कुलर, पंखे, ताडपत्री आणि इतर साहित्यही बाजूला केले आणि संध्याकाळपर्यंत आंदोलन पूर्णपणे मोडून काढलं. मोर्चाला परवानगी दिली नव्हती, तरीही आंदोलकांनी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. कुस्तीपटूंना धक्काबुक्की करून फरपटत बसगाड्यांमध्ये कोंबण्यात आलं असा आरोप आंदोलकांनी केला. ब्रिजभूषण यांच्याविरोधातील तक्रारीची केंद्र सरकारने गंभीर दखल न घेतल्यामुळे गेल्या महिन्याभरापासून महिला कुस्तीपटू जंतरमंतरवर ठिय्या आंदोलन करत आहेत.