Urvashi Rautela : उर्वशीच्या हरवलेल्या 24 कॅरेट सोन्याच्या iPhone चं लोकेशन ट्रॅक; अभिनेत्रीकडून बक्षीस जाहीर
उर्वशी रौतेलाने भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचदरम्यान तिचा अत्यंत महागडा फोन गमावला होता. हा फोन तिला अद्याप सापडला नाही. उर्वशीचा 24 कॅरेट खऱ्या सोन्याचा आयफोन हरवला होता. तो फोन शोधून देणाऱ्यांसाठी तिने आता बक्षीस जाहीर केलं आहे.
मुंबई : 18 ऑक्टोबर 2023 | गेल्या शनिवारी भारत विरुद्ध पाकिस्तानचा क्रिकेट सामना चांगलाच गाजला होता. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना पार पडला. यावेळी बऱ्याच सेलिब्रिटींनी तिथे हजेरी लावली होती. त्यापैकीच एक अभिनेत्री उर्वशी रौतेला होती. मात्र भारत विरुद्ध पाकिस्तानचा मॅच पाहणं उर्वशीला चांगलंच महागात पडलं. कारण या सामनादरम्यान तिचा अत्यंत महागडा फोन हरवला होता. हा काही साधासुधा फोन नव्हता. तर 24 कॅरेट खऱ्या सोन्याचा आयफोन होता. खुद्द उर्वशीने सोशल मीडियावर याबद्दलची माहिती दिली होती. सुरुवातीला अनेकांना हा एक पब्लिसिटी स्टंट असल्याचं वाटलं होतं. मात्र जेव्हा तिने पोलीस तक्रारीची कॉपी पोस्ट केली, तेव्हा नेटकऱ्यांना विश्वास बसला.
आता चार दिवस उलटल्यानंतरही उर्वशीला तिचा फोन सापडला नाही. हा फोन शोधून देणाऱ्यांसाठी तिने बक्षीससुद्धा जाहीर केलं आहे. उर्वशीने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने सांगितलंय की तिच्या फोनचं लोकेशन ट्रॅक झालं आहे. उर्वशीचा आयफोन अहमदाबादमधल्या एका मॉलमध्ये असल्याचं लोकेशनमध्ये दाखवतंय, असं तिने सांगितलं. हा फोन शोधून देणाऱ्यांना बक्षीस देणार असल्याचंही तिने पोस्टमध्ये लिहिलं आहे. मात्र हे बक्षीस काय असेल, याबद्दल तिने माहिती दिली नाही.
उर्वशीची पोस्ट
फोन हरवल्यानंतर उर्वशीने ट्विटरवर लिहिलं होतं, ‘अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये माझा 24 कॅरेट खऱ्या सोन्याचा फोन हरवल आहे. जर कोणाला हा फोन सापडला तर कृपया माझी मदत करा. मला तातडीने संपर्क करा.’ या ट्विटमध्ये तिने अहमदाबाद स्टेडियम आणि नरेंद्र मोदी स्टेडियम यांना टॅग केलं होतं. यासोबतच तिने पोलीस तक्रारीचा फोटोसुद्धा पोस्ट केला होता. तिच्या या पोस्टवर अहमदाबाद पोलिसांनी कमेंट करत विचारलं होतं, ‘मोबाइल फोनची अधिक माहिती द्या.’
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्वशीचा हा 24 कॅरेट सोन्याचा iPhone 14 Pro Max होता. या फोनला खास ऑर्डर अंतर्गत डिझाइन करण्यात आला होता. उर्वशीच्या या फोनची किंमत तब्बल 7 लाख 55 हजार 430 रुपये असल्याचं कळतंय.