Urvashi Rautela: तो RP नेमका कोण? उर्वशीने अखेर सोडलं मौन; म्हणाली “ऋषभ पंत हाच..”
अखेर RP या नावामागचं कन्फ्युजन मिटलं; उर्वशीनेच केला मोठा खुलासा
मुंबई: क्रिकेटर ऋषभ पंतला डेट करण्याच्या चर्चा जेव्हा सोशल मीडियावर होऊ लागल्या, तेव्हा अभिनेत्री उर्वशी रौतेलाला बरंच ट्रोल केलं गेलं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत उर्वशीने या चर्चांवर अखेर मौन सोडलं आहे. “माझ्या वक्तव्याचा लोक असा चुकीचा अर्थ काढतील याचा मला काहीच अंदाज नव्हता. आरपी हा माझा सहअभिनेता आहे आणि त्याचं नाव राम पोथिनेनी आहे. ऋषभ पंतसुद्धा आरपी म्हणून ओळखला जातो हे मला माहीतच नव्हतं”, असं उर्वशी म्हणाली. काही दिवसांपूर्वीच उर्वशीने अभिनेता राम पोथिनेनीसोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता.
अफेअरच्या चर्चांवर उर्वशीचं उत्तर-
“लोक फक्त गोष्टी गृहीत धरतात आणि त्याबद्दल लिहितात. अशा अफवांवर विश्वास ठेवणाऱ्यांना मी म्हणेन की त्यांनी थोडं विश्लेषण करावं. जर तुम्ही स्वत: काही पाहिलं नसेल आणि फक्त एखादा युट्यूबर किंवा एखादी व्यक्ती त्याविषयी बोलत असेल तर तुम्ही इतक्या सहजतेने कसा विश्वास ठेवू शकता”, असा सवाल उर्वशीने केला.
ऋषभ पंत आणि उर्वशी यांच्यात सोशल मीडियावर झालेला वाद जगजाहीर आहे. या वादानंतरही वर्ल्ड कपदरम्यान उर्वशी ऑस्ट्रेलियाला पोहोचली होती. त्यावेळी उर्वशीला ट्रोल केलं गेलं होतं. क्रिकेटर आणि अभिनेत्यांमध्ये लोक कशा पद्धतीने तुलना करतात, याविषयी तिने खंत व्यक्त केली.
क्रिकेटर्सना अभिनेत्यांपेक्षा जास्त मान का?
“आपण अनेकदा तुलना केल्याचं पाहतो की क्रिकेटर्सना अभिनेत्यांपेक्षा जास्त आदर मिळतो किंवा ते आमच्यापेक्षा जास्त कमावतात. हीच गोष्ट मला खुपते. मला हे मान्य आहे की ते देशासाठी खेळतात आणि त्यांच्यावर चाहत्यांकडून खूप प्रेम केलं जातं. पण अभिनेत्यांनीही खूप काही केलंय. कलाकारांनीही देशाचं प्रतिनिधित्व केलंय. मी स्वत: किती वेळा केलं आहे. पण मला ही तुलना आवडत नाही”, असं ती पुढे म्हणाली.
ऋषभ पंतला चिडवण्यावर प्रतिक्रिया
अनेकदा ऋषभ मैदानात खेळत असताना त्याला चाहत्यांकडून उर्वशीच्या नावाने चिडवलं गेलं. यावरही तिने प्रतिक्रिया दिली. “जो कोणी या देशाचं प्रतिनिधीत्व करतो, त्याचा आदर केलाच पाहिजे. त्यांना एखाद्या वस्तूप्रमाणे वागणूक दिली जाऊ नये. आपल्या गल्ली-मोहल्ल्यातील लोक असल्यासारखं त्यांच्याशी वागू नये. यालाच एखाद्याच्या खासगी आयुष्यात नाक खुपसणं म्हणतात आणि मला ते अजिबात आवडत नाही”, अशा शब्दांत तिने राग व्यक्त केला.
इतके दिवस मौन का बाळगलं?
ऋषभ पंतशी अफेअरच्या चर्चांवर इतके दिवस मौन का बाळगलंस, असा प्रश्न विचारला असता “लोक माझ्याबद्दल काय बोलतात याचा मी फारसा विचार करत नाही” असं तिने स्पष्ट केलं.
“सध्याच्या काळात ट्रोलिंग हा आयुष्याचा एक भागच झाला आहे. हा जणू एक ट्रेंड आहे आणि त्यात कधी ना कधी प्रत्येकाला टारगेट केलं जातं. प्रत्येकाला त्यातून जावं लागतं, याला पंतप्रधानही अपवाद नाहीत. पण माझ्या मते आयुष्यात इतर अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याबद्दल आपण विचार केला पाहिजे. त्यामुळे मी माझ्या कामावर लक्ष केंद्रीत करण्यास प्राधान्य देते”, असं म्हणत तिने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं.