अभिनेत्रीला डॉक्टरांनी दिले चुकीचे इंजेक्शन्स; बेडवरच रक्तस्राव, डिलिव्हरीचा भयानक अनुभव
अभिनेते राजेश खट्टर यांची पत्नी आणि अभिनेत्री वंदना सजनानी खट्टरने गरोदरपणातील कठीण काळाबद्दल खुलासा केला. डॉक्टरांनी चुकीचे इंजेक्शन्स दिल्यानंतर काय परिणाम झाला, याविषयी तिने सांगितलं.
अभिनेत्री वंदना सजनानी खट्टरने अनेक अडचणींचा सामना केल्यानंतर वयाच्या 45 व्या वर्षी पहिल्या बाळाला जन्म दिला. त्याआधी तिचा अनेकदा गर्भपात झाला होता. नुकत्याच दिलेल्या एका पॉडकास्ट मुलाखतीत वंदनाने मातृत्त्व अनुभवण्यासाठी ज्या समस्या आणि आव्हानं झेलली, त्याबद्दल सविस्तरपणे सांगितलं. वंदनाने अभिनेता राजेश खट्टरशी लग्न केलं. वयाच्या चाळिशीत आई बनल्यानंतर तिने आपली कहाणी प्रेक्षकांना सांगितली. वंदनाने पाचव्या महिन्यात बाळाला गमावलं होतं. अखेर अनेक अडचणींचा सामना केल्यानंतर ती लग्नाच्या 11 वर्षांनंतर आई झाली. वंदना आणि राजेश यांनी त्यांच्या मुलाचं नाव कृष्णा असं ठेवलंय.
पॉडकास्टमध्ये वंदना म्हणाली, “मी 35 वर्षांची असताना लग्न केलं, जे भारतीय स्टँडर्ड्सनुसार खूप उशीरा होतं. तेव्हा एग फ्रीजिंग, आयव्हीएफ, सरोगसी यांसारखे पर्याय तितके चर्चेत नव्हते. सुदैवाने लग्नाच्या काही महिन्यांतच मी गरोदर झाले. गरोदरपणातील काळ माझ्यासाठी खूप अवघड होता. गरोदरपणाच्या पाचव्या महिन्यातच माझा गर्भपात झाला होता. माझ्यासाठी तो अनुभव खूप त्रासदायक होता. कारण पाचव्या महिन्यात गर्भाची पुरेशी वाढ झालेली असते, श्वासोच्छवास सुरू असतो. माझ्या पतीने आणि भावाने त्या मृत गर्भाला नेलं. मी माझ्या बाळाला पाहूसुद्धा शकले नव्हते.”
“त्यानंतर माझा तीन-चार वेळा पुन्हा गर्भपात झाला. यापैकी एक तर माझ्या वाढदिवशीच झाला होता. माझ्या मित्रमैत्रिणींसोबत, जवळच्या व्यक्तींसोबत मी तो वाढदिवस साजरा केला होता. आम्ही पार्टी केली आणि अर्थातच मी माझी व्यवस्थित काळजी घेत होते. पण त्या पार्टीतून गाडीने घरी परतत असताना रस्त्यात एक स्पीड ब्रेकर लागला आणि रक्तस्राव होऊ लागला. या सततच्या घटनांमुळे मी नकारात्मक झाले होते. मला ब्रेक हवा होता आणि तेव्हाच मला झोया अख्तरने ‘दिल धडकने दो’ या चित्रपटासाठी फोन केला होता. माझ्या आयुष्यातील तो सर्वांत चांगला ब्रेक होता. शूटिंगवरून परतल्यानंतर मी नवऱ्याला म्हटलं की मी IVF करेन. मी तीन-चार वर्षांपर्यंत IVF द्वारे आई होण्याचा प्रयत्न केला. पण त्यातही मला तीन-चार वेळा अपयश आलं होतं”, असं वंदनाने पुढे सांगितलं.
गर्भपात आणि IVF मध्येही अपयश आल्यानंतर वंदनाने सरोगसीचा विचार केला. मात्र सरोगसी हासुद्धा सर्व पैशांचा खेळ असल्याचं तिच्या निदर्शनास आलं होतं. अखेर तिने बाळ दत्तक घेण्याचा निर्णय घेतला, मात्र तीसुद्धा किचकट प्रक्रिया असल्याचं तिला समजलं. अखेर शेवटच्या प्रयत्नात ती IVF द्वारे गरोदर राहिली. तिला जुळी मुलं होणार होती. आई होण्याचं स्वप्न आता कुठेतरी पूर्ण होणार या आनंदात असतानाच वंदनाला आणखी भयंकर समस्यांचा सामना करावा लागला होता.
View this post on Instagram
याविषयी तिने पुढे सांगितलं, “गरोदरपणाच्या दुसऱ्या महिन्यात मी चेकअपसाठी गेले होते. मी खूप चांगल्या डॉक्टरकडे गेली होती आणि तिने मला सांगितलं की माझं गर्भाशय कमकुवत आहे, एंडोमेट्रियमचा थर कमकुवत आहे. तिने मला पुढील नऊ महिने पूर्णपणे बेड रेस्टवर राहण्यास सांगितलं होतं. वॉशरुमला जाण्यासाठीही मला पाय जमिनीवर ठेवता येत नव्हते. अखेर सहाव्या महिन्यात सोनोग्राफी केल्यानंतर मला सांगण्यात आलं की एका बाळाची वाढ व्यवस्थित होत नाहीये. त्यात माझी डॉक्टर अमेरिकेला गेल्याने मी दुसऱ्या हॉस्पीटमध्ये शिफ्ट झाले. तिथे मी एका डॉक्टरला भेटले आणि सेलिब्रिटीच्या बाळाची डिलिव्हरी करण्यामागे तिचा काही छुपा अजेंडा होता का मला माहित नाही. पण ती तिच्या उद्देशानेच आली होती.”
“ती मला सतत इंजेक्शन्स देत होती आणि मला अचानक रक्तस्राव होऊ लागला. माझ्या आरोग्यासाठी बूस्टर्स देतेय, असं तिने मला सांगितलं होतं. मी अमेरिकेतल्या माझ्या डॉक्टरांशी बोलले, तेव्हा तिने मला कोणतेही इंजेक्शन्स न घेण्याचा आणि वेळेआधी डिलिव्हरी न करण्याचा सल्ला दिला होता. डॉक्टरांनी सांगितलं की माझी दोन्ही बाळं वेगवेगळ्या पिशवीत आहेत. त्यामुळे एक बाळ जरी श्वास घेत नसला तरी दुसरा खूप स्ट्राँग आहे. प्रत्येकजण माझ्यावर दबाव टाकत होता आणि त्यानुसार मी ऐकत होते. डॉक्टरांना त्याच वेळी डिलिव्हरी करायची होती. गरोदरपणाच्या सहाव्या महिन्यातच मला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं होतं. सिझरीननंतर एक बाळ जगू शकला नाही आणि दुसऱ्या बाळाचं वजन 650 ते 700 ग्रॅम इतकंच होतं. मी बेडवर होते आणि मला माझ्या बाळाला बघायचं होतं. डॉक्टरांनी माझं मानसिक, शारीरिक नुकसान केलं होतं. माझे टाकेही सुटले होते. त्यांनी कोणतीच गोष्ट जबाबदारीने केली नव्हती. पण माझं बाळ सुखरुप असल्याचं समाधान मला होतं. आम्ही जन्माष्टमीच्या दिवशी घरी आलो, म्हणून बाळाचं नाव कृष्णा असं ठेवलं”, अशा शब्दांत वंदना व्यक्त झाली.