Ved Box Office: ‘सैराट’नंतर रितेशच्या ‘वेड’ने रचला हा विक्रम; आतापर्यंत कमावले इतके कोटी रुपये
या चित्रपटात रितेशने पत्नी जिनिलिया डिसूझासोबत मुख्य भूमिकाही साकारली आहे. 'वेड'चं केवळ प्रेक्षक-समिक्षकांकडून कौतुकच झालं नाही, तर बॉक्स ऑफिसवरही त्याने दमदार कमाई केली.
मुंबई: रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ हा चित्रपट 30 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात रितेशने पत्नी जिनिलिया डिसूझासोबत मुख्य भूमिकाही साकारली आहे. ‘वेड’चं केवळ प्रेक्षक-समिक्षकांकडून कौतुकच झालं नाही, तर बॉक्स ऑफिसवरही त्याने दमदार कमाई केली. आतापर्यंत या चित्रपटाने 44.9 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटानंतर सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे. प्रदर्शनाच्या तिसऱ्या शनिवारी ‘वेड’ने 2.72 कोटी रुपयांची कमाई केली.
रितेशचा ‘वेड’ हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मजिली’ या चित्रपटाचा रिमेक आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दोन वीकेंडला 33.42 कोटी रुपयांची कमाई झाली. सध्या तिसरा आठवडाही चित्रपटासाठी सकारात्मक आहे. हा चित्रपट 15 कोटींच्या बजेटमध्ये तयार झाल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे ‘वेड’ फक्त नफाच कमवत नाहीये तर मराठी बॉक्स ऑफिसवर तो कमाईचे नवे विक्रमही रचतोय.
रितेश-जिनिलियाशिवाय ‘वेड’ या चित्रपटात अभिनेता सलमान खानने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. ‘वेड लावलंय’ या गाण्यात बॉलिवूडच्या ‘भाईजान’ला पाहिलं गेलंय. वेड या चित्रपटातून रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं आहे. तर जिनिलियाने मराठी चित्रपटसृष्टीत पहिलं पाऊल ठेवलंय. गेल्या वर्षी ही जोडी ‘मिस्टर मम्मी’ या हिंदी कॉमेडी चित्रपटात एकत्र झळकली होती.
#Marathi film #Ved is now the SECOND HIGHEST GROSSING #Marathi film, after #Sairat… As expected, biz doubles on [third] Sat [vis-à-vis Fri], expect big gains on Sun again… This one refuses to SLOW DOWN… [Week 3] Fri 1.35 cr, Sat 2.72 cr. Total: ₹ 44.92 cr. pic.twitter.com/fTBULiGa8l
— taran adarsh (@taran_adarsh) January 15, 2023
‘वेड’ने याआधीही ‘सैराट’ चित्रपटाचा एक विक्रम मोडला होता. प्रदर्शनाच्या दुसऱ्या रविवारी रितेश-जिनिलियाच्या ‘वेड’ने 5.70 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. कमाईच्या या आकड्यासह चित्रपटाने सुपरहिट ‘सैराट’चा विक्रम मोडला आहे. वेड या चित्रपटात रितेश आणि जिनिलियाशिवाय जिया शंकर, शुभंकर तावडे, अशोक सराफ, विद्याधर जोशी, विक्रम गायकवाड, खुशी हजारे आणि विनीत शर्मा यांच्याही भूमिका आहेत.