Vijay Deverakonda | विजय देवरकोंडा लवकरच बांधणार लग्नगाठ; पार्टनरविषयी पहिल्यांदाच म्हणाला..
या मुलाखतीत नात्यांविषयी बोलताना तो पुढे म्हणाला, "आयुष्यातील चढ-उतारांदरम्यान एकमेकांना समजून घेणं आणि प्रेमाने वागणं खूप महत्त्वाचं असतं. मला असं वाटतं की नातं म्हणजे एक प्रकारची भागीदारीच असते. प्रत्येक गोष्टीत आपण एकत्र उभं राहणं गरजेचं असतं."
मुंबई | 10 ऑगस्ट 2023 : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडाचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. विजय त्याच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असतो. ‘डिअर कॉम्रेड’, ‘गीता गोविंदम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याच्यासोबत भूमिका साकारलेली अभिनेत्री रश्मिका मंदानासोबत त्याचं नेहमी नाव जोडलं जातं. हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याचं वृत्त अनेकदा समोर आलं होतं. मात्र विजय आणि रश्मिकाने वेळोवेळी त्या चर्चांना फेटाळल्या आहेत. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विजय त्याच्या लग्नाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला आहे. आपण कधी लग्न करणार आहोत, याचाही खुलासा त्याने केला आहे.
लग्नाच्या प्लॅनविषयी प्रश्न विचारला असता विजय म्हणाला, “मला लवकरच लग्न करण्याची गरज आहे. कदाचित ती वेळ जवळ आली आहे. पण सध्या मला त्याबद्दल बोलण्यातही मजा येते. मला लग्नाबद्दल बोलायला आवडतंय. आयुष्यातील हा एक असा टप्पा आहे, जो प्रत्येकाने अनुभवला पाहिजे. पुढील दोन-तीन वर्षांत मी लग्न करेन. अजून तरी मी योग्य मुलीच्या शोधातच आहे.”
View this post on Instagram
या मुलाखतीत नात्यांविषयी बोलताना तो पुढे म्हणाला, “आयुष्यातील चढ-उतारांदरम्यान एकमेकांना समजून घेणं आणि प्रेमाने वागणं खूप महत्त्वाचं असतं. मला असं वाटतं की नातं म्हणजे एक प्रकारची भागीदारीच असते. प्रत्येक गोष्टीत आपण एकत्र उभं राहणं गरजेचं असतं.”
आधी लग्नाबद्दल बोलणं आवडायचं नाही, मात्र आता त्या विषयावर बोलायला काहीच अडचण वाटत नसल्याचंही विजयने स्पष्ट केलं. “मला असं वाटतं की आता मी त्यावर बोलण्यासाठी खूप कम्फर्टेबल झालो आहे. माझ्यासाठी आधी लग्न असा शब्द होता जो माझ्या आजूबाजूला असलेले लोक टाळायचे. त्या विषयावरून मी लगेच चिडायचो. पण आता त्याबद्दल चर्चा करण्यास मी कम्फर्टेबल आहे. मला माझ्या मित्रमैत्रिणींना लग्न करता पाहून आनंद होतो. आनंदी वैवाहिक जीवन, काही त्रासदायक नाती या सर्व गोष्टी मी पाहतोय आणि ते पाहताना मलाही मजा येतेय. माझंही स्वत:चं वैवाहिक जीवन असावं, असं मला आता वाटू लागलं आहे. आयुष्यातील हा टप्पा प्रत्येकाने अनुभवला पाहिजे”, असं तो म्हणाला.