पराभवाचा राग लोकांवर काढू नका; विराट-अनुष्काच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया
वर्ल्ड कपचा अंतिम सामना पार पडल्यानंतर टीम इंडियाचे क्रिकेटर त्यांच्या कुटुंबीयांसोबत घरी परतले आहेत. सोमवारी विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा मुंबई एअरपोर्टवर उतरले. यावेळी दोघंही पापाराझींवर चिडलेले दिसले. त्याचाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबई : 21 नोव्हेंबर 2023 | वर्ल्ड कप टूर्नामेंट संपुष्टात आला असून रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव केला. या पराभवानंतर संपूर्ण देशभरातील क्रिकेटप्रेमी निराश झाले. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा अंतिम सामना पार पडला होता. त्यानंतर आता क्रिकेटर्स आपापल्या घरी परतले आहेत. सोमवारी विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा मुंबई एअरपोर्टवर उतरले. यावेळी त्यांचा व्हिडीओ पापाराझींनी शूट केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनुष्का आणि विराट दोघं एअरपोर्टच्या प्रायव्हेट टर्मिनलमधून बाहेर निघताना दिसले. तिथेसुद्धा पापाराझी फोटो आणि व्हिडीओसाठी त्यांचा पाठलाग करत होते. एअरपोर्टबाहेर पापाराझींना पाहून विराट आणि अनुष्का चांगलेच नाराज झाले होते. ही नाराजी या व्हिडीओत स्पष्ट पहायला मिळाली.
विराट नेहमीच कुटुंबीयांसोबत असताना त्याच्या टीमला पापाराझींकडे फोटो न क्लिक करण्याची विनंती करतो. यावेळीही असंच काहीसं घडलं. विराटनंतर जेव्हा अनुष्का एअरपोर्टवरून बाहेर आली, तेव्हा तिने तिच्या स्टाफला सांगून पापाराझींना फोटो आणि व्हिडीओ क्लिक न करण्याचे निर्देश दिले. यावेळी अनुष्का काहीशी चिडलेलीच दिसली. त्यानंतर ती कारमध्ये जाऊन बसली. अनुष्काच्या चिडण्यामागचं कारण म्हणजे तिची मुलगी वामिकाचा फोटो कोणी क्लिक करू नये. पापाराझींनी वामिकाचे फोटो क्लिक करू नये म्हणून ती वारंवार सांगताना चिडलेली दिसली.
पापाराझींना तिथे उभं असल्याचं पाहून विराटने लगेच त्याच्या टीमला इशारा दिला. यानंतर त्याची टीम फोटोग्राफर्स आणि पापाराझींना फोटो किंवा व्हिडीओ क्लिक करण्यास नकार देताना दिसते. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. पुढचे काही दिवस तरी त्यांना अशा प्रकारे त्रास देऊ नका, अशी विनंती काही चाहत्यांनी पापाराझींना केली. तर त्यांच्या खासगी आयुष्यात मर्यादेपेक्षा जास्त डोकावू नका, असंही काहींनी म्हटलंय.
पहा व्हिडीओ
View this post on Instagram
कोट्यवधी लोकांच्या अपेक्षांच्या दडपणाखाली टीम इंडिया रविवारी वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पूर्णपणे निष्प्रभ ठरला. वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने सलग 10 दहा सामने जिंकले होते. मात्र अकराव्या अंतिम सामन्यात मुरब्बी ऑस्ट्रेलियाने मोक्याच्या क्षणी बाजू उलटवली. ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कपवर सहाव्यांदा आपलं नाव कोरलं. या पराभवानंतर अनेकांचे डोळे पाणावले होते. विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा हा सामना पाहण्यासाठी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पोहोचली होती. टीम इंडियाच्या पराभवानंतर अनुष्कालाही अश्रू अनावर झाले.