गौतम गंभीरसोबतच्या वादानंतर अनुष्कासोबत मंदिरात पोहोचला विराट कोहली; नेटकरी म्हणाले ‘भांडण करा अन्..’
नवीन उल हक आणि विराट या दोघांमध्ये हमरीतुमरी झाली. त्यानंतर सामन्याच्या निकालानंतर हे दोघं हस्तांदोलन करताना भिडले. यानंतर या दोघांच्या वादात लखनऊ सुपर जायंट्स टीमचा मेन्टॉर आणि विराट कोहलीचा वैरी असलेला गौतम गंभीरने उडी घेतली.
लखनऊ : अभिनेत्री अनुष्का शर्मा प्रत्येक महत्त्वाच्या क्षणी पती विराट कोहलीसोबत खंबीरपणे उभी असल्याचं पहायला मिळतं. सध्या आयपीएल सिझन चालू असल्याने अनुष्का प्रत्येक शहरात विराटसोबत दिसतेय. ती नुकतीच विराटच्या टीमची मॅच पाहण्यासाठी लखनऊला पोहोचली होती. यावेळी दोघं पती-पत्नी एका मंदिरात देवदर्शनासाठी गेले. या दोघांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अनुष्काने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. तर विराटने धोती आणि शॉल परिधान केला आहे. कपाळावर टिळा आणि गळ्यात माळ घातलेले हे दोघं भक्तीत लीन झालेले पहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ नेमका कोणत्या मंदिरातील आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
विराट आणि अनुष्काच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होतोय. या कमेंट बॉक्समध्ये काहींनी नुकत्याच झालेल्या गौतम गंभीरसोबतच्या वादाचाही उल्लेख केला आहे. ‘भांडण करा आणि मग मंदिरात जा’ असं एकाने लिहिलंय. तर ‘चांगलं खेळणं हेच सर्वस्व नसतं. संस्कारसुद्धा असायला हवेत’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘विराट कोहलीला फक्त अनुष्काच शांत करू शकते’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.
आयपीएलच्या 16 व्या हंगामात सोमवारी 1 मे रोजी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना खेळवण्यात आला. यावेळी आरसीबीने लखनऊला विजयासाठी 127 रन्सचं टार्गेट दिलं होतं. मात्र आरसीबी गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर लखनऊला हे आव्हान झेपलं नाही. लखनऊचा बाजार 19.5 ओव्हमध्ये 108 धावांवर आटोपला. यावेळी लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक आणि आरसीबी बॅट्समन विराट कोहली यांच्यात दुसऱ्या डावातील 17 व्या ओव्हरमध्ये कडाक्याचं भांडण झालं.
View this post on Instagram
नवीन उल हक आणि विराट या दोघांमध्ये हमरीतुमरी झाली. त्यानंतर सामन्याच्या निकालानंतर हे दोघं हस्तांदोलन करताना भिडले. यानंतर या दोघांच्या वादात लखनऊ सुपर जायंट्स टीमचा मेन्टॉर आणि विराट कोहलीचा वैरी असलेला गौतम गंभीरने उडी घेतली. त्यानंतर नवीन उल हक राहिला बाजूलाच. गंभीर आणि विराट यांच्या दोघांमध्ये तुफान वाजलं. आता हे एकमेकांवर हात उगारतात की काय, असंच तो वाद पाहणाऱ्या प्रत्येकाला वाटत होतं. या सर्व प्रकारानंतर गंभीर आणि विराट या दोघांना एका सामन्याचं मानधनाची रक्कम दंड म्हणून द्यावी लागली. तर नवीन उल हक त्या तुलनेत स्वसतात सुटला.