“मी 100 इंजेक्शन्स घेतले, तो शेवटचा चान्स होता”; अभिनेत्रीने सांगितला प्रेग्नंसीचा वेदनादायी अनुभव
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री माही विजने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गरोदरपणातील तिचा वेदनादायी अनुभव सांगितला. माही IVF पद्धतीने आई होण्यासाठी प्रयत्न करत होती. मात्र तीन वेळा त्यात तिला अपयश आलं होतं.
अभिनेत्री माही विजने टीव्ही स्टार जय भानुशालीसोबत लग्न केलं. 2019 मध्ये IVF च्या माध्यमातून या दोघांना तारा ही मुलगी झाली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत माहीने गरोदरपणात आलेल्या समस्यांविषयी सांगितलं. वयाच्या 34 व्या वर्षी तिने आयव्हीएफच्या मदतीने आई होण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी तिला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं होतं. अनेकदा प्रयत्न करूनही माहीला अपयश आलं होतं. जय भानुशालीने सांगितलं होतं की त्याचा आणि माहीचा IVF चा तो अखेरचा प्रयत्न होता. त्याने माहीला स्पष्ट केलं होतं की त्यानंतर तो कधीच तिला IVF साठी बळजबरी करणार नाही.
‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत माही म्हणाली, “माझे IVF चे तीन सायकल फेल झाले होते आणि चौथ्या प्रयत्नात मी जुळ्या मुलांची आई बनली. त्यातही पहिले तीन महिने मी पूर्णपणे बेड रेस्टवर होती. मी फक्त सोनोग्राफीसाठी रुग्णालयात जायचे. तिथे डॉक्टरांनी इंजेक्शन दिल्यानंतर मी घरी यायचे. आम्ही दोघं आईवडील होणार म्हणून खूप खुश होतो. पण एके दिवशी डॉक्टरांनी सांगितलं की माझ्या दोन्ही मुलांचा जीव जाऊ शकतो. या IVF प्रक्रियेदरम्यान मला जवळपास 100 इंजेक्शन्स देण्यात आले होते. अखेर ताराचा जन्म प्रीमॅच्युअर झाला. यामुळे तिला शंभर दिवसांपर्यंत NICU मध्ये ठेवण्यात आलं होतं. जुळ्यांपैकी दुसऱ्या बाळाचा जन्म होऊ शकला नाही.”
View this post on Instagram
“ताराचा जन्म हा आमचा अखेरचा प्रयत्न होता आणि तो यशस्वी ठरला. त्यानंतर जरी मला 100 इंजेक्शन्स दिले असते तरी त्याच्या वेदना जाणवल्या नसत्या. कारण ते माझ्या बाळाच्या भल्यासाठी असेल हे मला माहीत होतं. मी गरोदर असतानाही मला बरेच इंजेक्शन्स देण्यात आले होते. पण तेव्हासुद्धा मी खुश होती, कारण मी आई बनणार होती. आयुष्यात प्रत्येक गोष्ट सहजपणे होईल अशी आपण अपेक्षा करू शकत नाही”, अशा शब्दांत माही व्यक्त झाली.
ताराच्या जन्मानंतर जय आणि माहीने आणखी दोन मुलांना दत्तक घेतलं. खुशी आणि राजवीर अशी त्यांची नावं आहेत. माही आणि जयची मुलगी तारा आता सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. ती लहान वयातच सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर बनली. ताराच्या इन्स्टाग्राम पेजला दोन लाखांहून अधिक नेटकरी फॉलो करतात. बॉलिवूड सेलिब्रिटींमध्येही ताराची लोकप्रियता आहे.