अरुणा ईरानी यांनी का लपवलं होतं लग्न? का घेतला आई न होण्याचा निर्णय? अनेक वर्षांनंतर अभिनेत्रीकडून खुलासा
दिग्गज अभिनेत्री अरुणा ईरानी या त्यांच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असायच्या. कधी अभिनेते मेहमूद यांच्यासोबत अफेअर तर दिग्दर्शक कुकू कोहली यांच्यासोबतच्या लग्नामुळे त्या प्रकाशझोतात आल्या होत्या. त्यांनी बरीच वर्षे लग्न लपवून ठेवलं होतं.
दिग्गज अभिनेत्री अरुणा ईरानी यांनी फर्ज, रॉकी, बॉबी आणि लव्ह स्टोरीसारख्या गाजलेल्या अनेक चित्रपटात काम केलं. दमदार अभिनयासाठी त्या ओळखल्या जातात. अरुणा यांना इंडस्ट्रीमध्ये सहा दशकांपेक्षा अधिक काळ झाला आहे. त्या अजूनही अभिनयामध्ये सक्रीय आहेत. अरुणा ईरानी या अभिनयाबरोबर आपल्या व्यक्तीगत आयुष्यासाठीसुद्धा चर्चेत राहिल्या. अभिनेते महमूद यांच्यासोबतच्या अफेअरमुळे तर कधी दिग्दर्शक कुकू कोहलीसोबतच्या लग्नामुळे नेहमीच त्या माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरल्या. अरुणा ईरानी यांनी बराच काळ आपलं लग्न झाल्याचं लपवून ठेवलं होतं. आता अलीकडेच एका मुलाखतीत त्यांनी कुकू कोहलीसोबतच्या प्रेम संबंधांबद्दल तसंच लग्न का लपवलं याचा खुलासा केला.
“कुकू आणि मी सुरुवातीला परस्परांचा द्वेष करायचो. कोहराम चित्रपटाच्यावेळी कुकू बरोबर माझी पहिली भेट झाली होती. त्यावेळी घर चालवण्यासाठी मी बऱ्याच चित्रपटात काम करत होते. त्यावेळी कुकू यांनी एक महिन्यासाठी माझ्या डेट्स मागितल्या होत्या. मी मद्रासमध्ये माझ्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते. मी प्रयत्न केले, पण नंतर चित्रपट शक्य नसल्याचं सांगितलं. कुकूजी हे ऐकून रागावले. पण, तरीही आम्ही सोबत काम करत होतो”, असं अरुणा ईरानी यांनी ‘झूम’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
असं झालं प्रेम
“कधी कधी ते मला पूर्ण दिवस बसवून ठेवायचे. मग एखादा सीन शूट करायचे, त्यावेळी मला खूप राग यायचा. मी त्यांचा द्वेष करायची, त्यांनाही मी आवडत नव्हते. पण नंतर काय झालं माहित नाही, त्यांचा स्वभाव बदलला. माझ्यातारखा एडजेस्ट करायला सुरुवात केली. शेवटी आमच्यात प्रेम झालं, आम्ही मित्र बनलो” असं अरुणा ईरानी म्हणाल्या.
लग्नाचं का लपवलं?
कुकू कोहलीसोबत लग्नाची गोष्ट का लपवली? त्याचा खुलासासुद्धा अरुणा ईरानी यांनी केला. “कुकू यांचं पहिल लग्न झालं होतं. त्यामुळे मी सर्वांपासून ही गोष्ट लपवली. मला त्यांच्या पहिल्या लग्नाबद्दल माहित नव्हतं, ही मूर्खपणाची बातमी कोणातरी पसरवली होती. त्यांची पत्नी मुलांसोबत सेटवर यायची, हे मला माहित होतं. माझ्यासाठी हा खूप कठीण निर्णय होता, पण आमचंं लग्न झालं. माझ्यासोबत लग्न करण्यासाठी ते समाजासोबत लढले. मी आई न बनण्याचा निर्णय घेतलेला, त्या बद्दल मला आज खेद वाटतो” असं अरुणा ईरानी म्हणाल्या.
1990 साली वयाच्या चाळीशीत अरुणा ईरानी यांनी कुकू कोहली यांच्यासोबत लग्न केलं. लग्न केलं, तेव्हा कुकू यांचा पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला नव्हता, असं अरुणा मुलाखतीत म्हणाल्या.