WITT 2025: “एकेकाळी हिंदी सिनेमाचा दबदबा होता आता साऊथचा आहे, 10-15 वर्षांनंतर हेसुद्धा..”; विजय देवरकोंडा असं का म्हणाला?
दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा हा WITT ग्लोबल समिटमध्ये उपस्थित होता. यावेळी तो बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. त्याने अभिनेता रणबीर कपूरचंही कौतुक केलं.

‘टीव्ही 9’चा वार्षिक कार्यक्रम ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ ग्लोबल समिट 2025 ची रंगतदार सुरुवात झाली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी ते देशाच्या वाढत्या अर्थव्यवस्थेबद्दल बोलले. शिवाय त्यांनी मीडिया क्षेत्रात ‘टीव्ही 9’ नेटवर्कच्या कामाचं कौतुक केलं. या कार्यक्रमात राजकारण, उद्योग आणि मनोरंजन जगतातील नामवंत व्यक्ती सहभागी झाले होते. सध्या तरुणाईमध्ये लोकप्रिय असलेला दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडानेही ‘WITT 2025’मध्ये भाग घेतला. यावेळी त्याने बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपट यांच्यातील तुलनेवर मोकळी प्रतिक्रिया दिली.
विजय देवरकोंडाने ‘स्टारडम नोज नो लँग्वेज’ या विभागातील ‘सिनेमा का विजयपथ’ या सत्रात हजेरी लावली. या मुलाखतीत त्याला दाक्षिणात्य चित्रपटांकडून बॉलिवूडला मिळणाऱ्या तगड्या टक्करविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर विजयनेही त्याचं स्पष्ट मत मांडलं. “दाक्षिणात्य चित्रपटांनी त्यांचा कंटेंट इतका मजबूत बनवलाय की आता बॉलिवूडलाही त्यांची स्ट्रॅटेजी म्हणजेच रणनिती बदलावी लागतेय, असं तुला वाटतं का”, असा सवाल विजयला विचारण्यात आला होता.
या प्रश्नाचं उत्तर देताना विजय म्हणाला, “तेलुगू चित्रपटांना अधिक प्रेक्षकवर्ग मिळवण्यासाठी आपली वेगळी लढाई लढावी लागेल. जेव्हा एस. एस. राजामौली सरांनी ‘बाहुबली’ हा चित्रपट बनवला आणि त्यात ज्या दोन कलाकारांवर त्यांनी मोठी गुंतवणूक केली होती, त्यांच्याबद्दल तेव्हा बॉलिवूड इंडस्ट्रीला फारसं काही माहीत नव्हतं. त्यामुळे जर तो चित्रपट हिट झाला नसला तर केवळ पैसाच गेला नसता तर अनेक कलाकारांचं करिअरही संपलं असतं. निर्मातेही खूप अडचणीत आले असते. कारण निर्मात्यांना त्या चित्रपटासाठी पाच वर्षे लागली होती. पण सर्वांनी एकत्र खूप मेहनत केली. आम्हाला आमचं स्थान मिळवण्यासाठी किंवा टिकवण्यासाठी संघर्ष करावाच लागेल. मला असं वाटतं की हे असंच असतं. प्रत्येकजण आपापली जागा शोधतोय आणि हाच जीवनाचा एक भाग आहे.”




दाक्षिणात्य चित्रपटांच्या यशाचं रहस्य काय?
या चर्चेदरम्यान विजय देवरकोंडाला पुढे विचारण्यात आलं की, “दाक्षिणात्य चित्रपटांच्या यशामागचं रहस्य किंवा गुपित काय आहे?” त्यावर विजय म्हणाला, “दक्षिण भारतीय चित्रपट इतके चांगले का चालले आहेत, हे मला नेमकं माहीत नाही. पण हे घडतंय याचा मला आनंद आहे. आमच्याकडे खूप प्रतिभावान दिग्दर्शकांचा एक गट आहे. एकापेक्षा जास्त पटकथा आहेत. मी वर्षातून फक्त एकच चित्रपट करतो आणि इतर अनेक चित्रपटांना खूप चांगलं यश मिळतंय. मला माहीत नाही की काय बदललंय, पण आमचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगले चालतायत. एक काळ असा होता की जेव्हा हिंदी चित्रपटांचं वर्चस्व होतं. आता साऊथचा आहे. 10-15 वर्षांनंतर हेसुद्धा बदलेल.”