पित्तामुळे आहात सतत त्रस्त? औषधांसह हे घरगुती उपायही ठरू शकतात उपयुक्त!
तुम्हाला पित्त झाल्यामुळे तासनतास त्रास होत असेल आणि औषधांमुळेही फरक पडत नसेल तर हे घरगुती उपाय करून पहा. या उपायांनी तुम्हाला लवकर आराम मिळू शकेल.
नवी दिल्ली: त्वचेवर लाल रॅशेस उठणे किंवा फोड येणे याला सामान्य भाषेत पित्त उसळणे (skin problem) असे म्हणतात. त्याला वैद्यकीय भाषेत हाइव्स (hives) किंवा अर्टिकेरिया म्हटले जाते. यामुळे त्वचेवर खाज सुटते आणि वेदना होतात, जे वाढल्यामुळे रात्री तासनतास झोप लागत नाही. हा त्वचेच्या ॲलर्जीचा (allergy) एक प्रकार आहे. सामान्यत: जेव्हा शरीराचे तापमान योग्य नसते तेव्हा हा त्रास होतो. तसं पहायला गेलं तर पोट साफ न होणे, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, औषधांचा चुकीचा परिणाम, जास्त घाम येणे अशा समस्यांमुळेही पित्ताचा त्रास होऊ शकतो. बहुतेक प्रकरणांमध्ये, हा त्रास लवकर बरा होतो, मात्र काही वेळा याचा परिणाम बराच काळ टिकून राहू शकतो. पित्त झाल्यामुळे तुम्हाला तासनतास त्रास होत असेल आणि औषधांमुळेही फरक पडत नसेल तर हे घरगुती उपाय करून पहा. या उपायांनी तुम्हाला लवकर आराम मिळू शकेल.
आल्याचा वापर
पित्तासाठी आयुर्वेदात आलं वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आल्यामधील ॲंटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म हे शरीरावरील सूज कमी करण्याचे कार्य करते. आल्याचे गुणधर्म शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम करतात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आलं पाण्यात उकळून ते पाणी पिऊ शकता. किंवा आल्याचा रस घेऊन त्यात एक चमचा मध मिसळून त्याचे सेवन करावे. रात्री झोपण्यापूर्वी ही कृती करावी. फरक दिसून येईल.
टी ट्री ऑईल
त्वचेच्या मॉयश्चरायझेशन साठी सर्वात उत्तम असलेल्या टी ट्री ऑईलमध्ये ॲंटी-बॅक्टेरिअल आणि ॲंटी- इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. ते इन्फेक्शन दूर करतात आणि त्वचेची दुरुस्ती करण्यास मदत करतात. हे ऑईल सेवन करण्याची गरज नाही, तर ते त्वचेवर लावावे. त्यासाठी एका भांड्यात थोडे पाणी घेऊन त्यामध्ये टी ट्री ऑईलचे 10-12 थेंब टाकावेत. त्यानंतर त्या पाण्यात कापसाचा बोळा भिजवून तो पित्ताचा त्रास झालेल्या भागावर लावावा.
नारळाच्या तेलाचे फायदे
नारळाचे तेल हे सर्वोपयोगी असून तुम्ही त्याचा दैनंदिन जीवनात वापर करू शकता. नारळाच्या तेलामध्ये अनेक व्हिटॅमिन्स, ॲंटी-बॅक्टेरिअल आणि ॲंटी- इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात जे त्वचा दुरुस्त करण्याचे कार्य करतात. आणि पूर्वीप्रमाणे त्वचेचा रंग सुधारतो. पित्ताचा त्रास होत असेल तर नारळाच्या तेलाचा वापर करावा. हातावर नारळाचे तेल घेऊन ते त्वचेवर लावावे. थोड्यावेळाने आराम मिळेल.