Leg pain : रात्रीच्या वेळेस पायात तीव्र वेदना झाल्यास, या घरगुती उपायांनी मिळवा आराम
दिवसभराच्या कामामुळे थकून झोपल्यानंतर काही कारणामुळे रात्री पायात वेदना होऊ शकतात. अशा वेळी घरच्याघरी काही उपाय करून या वेदनांपासून मुक्ती मिळवता येते.
रात्रीच्या वेळेस थकून झोपल्यानंतर अनेक महिलांना पायात तीव्र वेदना होतात (Leg Pain) आणि त्यांची झोपमोड होते, हे आपण बरेच वेळा ऐकले असेल. या वेदनांमुळे नंतर नीट झोपही लागत नाही. दिवसभराची कामं, दगदग, पुरेसा पोषक आहार न घेणे, किंवा वाढलेले वजन अन्यथा इतर काही कारणांमुळे पायात वेदना होऊ शकतात. रात्रीच्या वेळेस डॉक्टरांकडे (Doctor) जाणं सगळ्यांना शक्य होईलंच असेही नाही. वेदनांमुळे रात्री नीट झोप लागत नाही. झोप पूर्ण न झाल्यास दुसऱ्या दिवशी थकवा येऊ शकतो आणि चिडचिडही होऊ शकते. तसेच डोळ्यांखाली काळी वर्तुळंही येऊ शकतात. हे सगळं टाळायचं असेल तर पायाच्या वेदनांवर उपाय शोधणे गरजेचे आहे. अन्यथा गंभीर स्वरुपाचा त्रास सहन करावा लागू शकतो. काही घरगुती उपायांनी (Home remedy) पायातील वेदना कमी करता येऊ शकतात. जाणून घेऊया माहिती.
पायातील वेदनांपासून अशी मिळवा मुक्ती
मोहरीचे तेल – जर तुमच्या पायात खूप वेदना होत असतील तर पायांना मोहरीच्या तेलाने मालिश करावे. त्यामुळे तुम्हाला लगेच आराम मिळेल. हा सर्वाधिक वापरला जाणारा उपाय आहे.
ॲपल साइडर व्हिनेगर – ॲपल साइडर व्हिनेगर हे पायातील वेदना कमी करण्याचा आणखी एक उपाय आहे. यामध्ये एनाल्जेसिक गुणधर्म असतात, ज्यामुळे सूज आणि वेदना दोन्ही कमी होतात. त्यासाठी दोन चमचे ॲपल साइडर व्हिनेगरमध्ये थोडा मध मिसळावा आणि हे मिश्रण रिकाम्या पोटी प्यावे. या उपायाने पायातील वेदना कमी होतील.
मेथी – मेथीमध्ये खूप औषधी गुणधर्म असतात. मेथीच्या सेवनाने व वेदनेपासून मुक्ती मिळते. एक चमचा मेथी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावी व सकाळी उठल्यानंतर त्याचे सेवन करावे. या उपायानेही तुमच्या पायातील वेदना कमी होतील.
योगासने – नियमितपणे व्यायाम करणे हे सर्वांसाठीच फायदेशीर असते. योगासने केल्यासही पायांना आराम मिळू शकतो. योगासनांमुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि शरीर लवचिक होते. पायातील वेदना कमी करण्यासाठी नियमितपणे योगासने करावीत. त्याचा फायदा नक्की होईल.
( टीप- या आर्टिकलमध्ये सुचवण्यात आलेले उपाय व दिलेले सल्ले हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. )