पाकिस्तानातील भिकारी विमानाने थेट सौदीकडे, काय घडतंय पाकिस्तानात?; आखाती देश वैतागले
पाकिस्तानात आर्थिक अराजक निर्माण झालं आहे. त्यामुळे पाकिस्तानातील जनतेचं जगणं मुश्किल झालं आहे. हातात पैसा नाही, रोजगार नाही आणि महागाईचा उसळलेला आगडोंब यामुळे पाकिस्तानातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
मुल्तान | 1 ऑक्टोबर 2023 : पाकिस्तान हा देश आर्थिकदृष्ट्या कंगाल झालेला आहे. या देशात आर्थिक अराजक निर्माण झालं आहे. आर्थिक बोजवारा उडाल्याने पाकिस्तानात महागाईने डोकं वर काढलं आहे. लोकांचे खाण्याचे वांदे झाले आहेत. मध्यंतरी तर अन्नधान्य घेण्यासाठी पाकिस्तानमध्ये नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. पाकिस्तान इतका कंगाल झाला आहे की भिकाऱ्यांची निर्यात करणारा देश म्हणूनही आता पाकिस्तानची ओळख निर्माण होताना दिसत आहे. तसं प्रकरणही समोर आलं आहे. मुल्तान विमानतळावर 16 भिकाऱ्यांची धरपकड करण्यात आली आहे. हे भिकारी सौदीला जाणाऱ्या विमानात बसले होते. त्यांना तात्काळ विमानातून हाकलण्यात आलं आल्याचा प्रकार समोर आला आहे.
संघीय तपास यंत्रणेने (एफआयए) दोन दिवसांपूर्वी ही कारवाई केली. मुल्तान विमानतळावर सौदी अरबला जाणाऱ्या विमानातून 16 भिकाऱ्यांना खाली उतरवलं. विशेष म्हणजे उमरा तिर्थयात्रेकरूंच्या वेषात हे भिकारी सौदीला निघाले होते. ज्या भिकाऱ्यांना विमानातून उतरवण्यात आलं आहे. त्यात एक मुलगा, 11 महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे, तशी माहिती पाकिस्तानच्या डॉन न्यूज चॅनलने एफआयएच्या हवाल्याने सांगितलं आहे.
कसून चौकशी करताच…
हे भिकारी उमरा व्हिसाच्या माध्यमातून देश सोडून सौदी अरबला जात होते. मात्र, एफआयएच्या अधिकाऱ्यांनी या भिकाऱ्यांची कसून चौकशी केली. त्यावेळी त्यांनी आपण सौदीला भीक मागण्यासाठी जात असल्याचं सांगितलं. सौदीला जेवढी भीक मिळेल त्यातील अर्धा भाग त्यांच्या प्रवासाची व्यवस्था करणाऱ्या एजंटांना द्यायचा होता, अशी कबुलीही त्यांनी दिली आहे.
कारवाई होणार
उमरा व्हिसा संपल्यानंतर त्यांना पाकिस्तानात परत यायचं होतं. पण या भिकाऱ्यांना जाण्यापूर्वीच पकडण्यात आलं आहे. दरम्यान, एफआयएने मुल्तानच्या या भिकाऱ्यांना अटक केली आहे. त्यांची कसून चौकशी सुरू असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या सीनेट समितीतही एक दिवस आधीच पाकिस्तानातून भिकाऱ्यांना बाहेर देशात पाठवलं जात असल्याचा गौप्यस्फोट करण्यात आला होता. त्यानंतर हा प्रकार उघड झाल्याने त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
90 टक्के भिकारी पाकिस्तानी
परदेशात पकडण्यात आलेले 90 टक्के भिकारी हे पाकिस्तानातील आहे. या भिकाऱ्यांना अटक केल्याने तुरुंगात गर्दी वाढल्याचं इराक आणि सौदीच्या राजदूतांनी म्हटल्याचं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिवाने सीनेट पॅनलसमोर स्पष्ट केलं आहे.
व्हिसाचा गैरफायदा
सुमारे 30 लाख पाकिस्तानी सौदी अरब, 15 लाख संयुक्त अरब अमिरात आणि दोन लाख कतारमध्ये आहेत. सौदी अरब, इराक आणि ईराणला जाण्यासाठी हज यात्रेसाठी देण्यात येणाऱ्या व्हिसाचा फायदा भिकारी उचलतात. हा व्हिसा मिळवून त्या देशात भीक मागण्याचं काम करतात. एकदा का त्या देशात पोहोचले की हे भिकारी परत येत नाही. तिथेच भीक मागतात, असं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव जुल्फिकार हैदर यांनी सांगितलं. मोठ्या प्रमाणावर भिकारी पाकिस्तान सोडत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.