काबूलमध्ये दहशतवादी हल्ला, तीन महिन्यात 37 आत्मघातकी हल्ले, अफगाणिस्तान का धुमसतंय?
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे (Afghanistan bomb blast in Kabul).
काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे (Afghanistan bomb blast in Kabul). या हल्ल्यात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला. अतिरेक्यांनी यावेळी खासदार हाजी खान मोहम्मद वरदक यांच्या कारवर निशाणा साधला. या हल्ल्यात खासदार वरदक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यासह आणखी 15 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींमध्ये लहान मुलं आणि महिलांचादेखील समावेश आहे. काबूल शहरातील पीडी 5 क्षेत्रातील स्पिन ब्लॅक चौकात ही दुर्घटना घडली आहे. काबूल पोलीस मुख्यालयाने या हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे (Afghanistan bomb blast in Kabul).
अफगाणिस्तानमध्ये वारंवार दहशतवादी हल्ल्याच्या घटना घडत आहेत. अतिरेक्यांकडून गेल्या तीन महिन्यात 37 आत्मघातकी हल्ल्याचा प्रयत्न झाला. अफगाणिस्तानचे सुरक्षा दल अतिरेक्यांना तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न करतात. मात्र, तरीदेखील हल्ले घडवून आणण्यात अतिरेकी यशस्वी ठरतात. या हल्ल्यांमध्ये शेकडो महिला, बालकं आणि वृद्ध नागरिकांचा बळी जातो.
दरम्यान, रविवारी झालेल्या हल्ल्यात तीन वाहने जळून खाक झाली, अशी माहिती अफगाणिस्तानच्या गृह मंत्रालयाचे प्रवक्ता फरदास फारामर्ज यांनी दिली. सरकारने जारी केलेल्या निवेदनात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
اعلامیه مطبوعاتی در پیوند به حمله تروریستی امروز در کابل
کابل، وزارت امور داخله: تروریستان امروز با انجام یک حملهٔ تروریستی در مربوطات حوزه ۵ کابل دست به جنایت زدند. کودکان، زنان و کهنسالان شامل مجروحین این رویداد میباشند و به خانههای اطراف رویداد متذکره خسارات هنگفت
— Tariq Arian (@TariqArian3) December 20, 2020
अफगाणिस्तान सरकार काय म्हणालं?
“अतिरेक्यांनी आज काबूल शहराच्या पीडी 5 भागाला लक्ष्य केले. या हल्ल्यात लहान मुले, स्त्रिया आणि वृद्ध जखमी झाले. दुर्दैवाने या हल्ल्यात आठ जण ठार झाले आहेत. तर 15 जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यात खासदार वरदक हेदेखील जखमी झाले आहेत”, असं गृहमंत्रालयाने निवेदनात म्हटलं आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. दरम्यान, आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
अफगाणिस्तान सरकारने अतिरेक्यांविरोधात मोहिम राबवत असल्याची माहिती दिली आहे. अतिरेक्यांचे सर्व कट उधळून लावू, असं अफगाण सरकारने सांगितलं आहे. अफगाणिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी आतापर्यंत अतिरेक्यांचे अनेक कट उधळून लावले आहेत. अतिरेक्यांनी गेल्या तीन महिन्यात 37 आत्मघातकी हल्ले घडवून आणण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 500 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1050 नागरिक जखमी झाले आहेत.
हेही वाचा : हवं तर कांजूर कारशेडचं श्रेय तुम्हाला देतो, पण कद्रूपणा सोडा; मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना आवाहन