भूकंपाने अख्खा देशच हादरला, 126 इमारती पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या; गॅस पाईपलाईन फुटल्याने हाहा:कार
चीनप्रमाणे भारतातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दिल्ली आणि आसपासच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्ली-एनसीआरपासून ते चंदीगड-पंजाबमधील नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवले.
बीजिंग | 6 ऑगस्ट 2023 : चीनच्या शेडोंग प्रांतात भूकंपाचे जोरदार झटके जाणवले आहेत. या भूकंपामुळे शेडोंगमध्ये हाहा:कार उडाला आहे. हा भूकंपाचा धक्का इतका भयानक होता की त्यामुळे इमारती स्प्रिंगसारख्या हलू लागल्या. त्यामुळे लोक घाबरून इमारतीबाहेर पळाले. पळताना अनेकजण पडले, धडपडले. अनेकांना पळतानाच पडल्याने मार लागला. अनेकजण जखमीही झाले. आज मध्यरात्री 2 वाजून 33 मिनिटांनी हा भूकंप झाला. देशभरातील लोक गाढ निद्रेत असताना हा धक्का जाणवला. या भूकंपाने किती नुकसान झालं हे रात्री कळलं नाही. पण उजाडताच धक्कादायक चित्र समोर आलं. या भूकंपामुळे 126 इमारती जमीनदोस्त झाल्या. अनेक घरे कोसळली. या भूकंपात आतापर्यंत 21 लोक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा अजूनही समोर आलेला नाही. मात्र, भूकंपामुळे चीन संपूर्ण हादरून गेला आहे.
चीनमध्ये आलेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.5 एवढी नोंदवली गेली. या भूकंपाचा केंद्रबिंदू देझोऊ येथे होता. जमिनीखाली केवळ 10 किलोमीटरवर या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याने एवढा मोठा हाहा:कार उडाला आहे. चीनची राजधानी बीजिंगपासून 300 किलोमीटर अंतरावर हा भूकंपाचा केंद्रबिंदू होता. चीनी भूकंप नेटवर्क केंद्राच्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.5 एवडी होती. तर अमेरिकन जिओलॉजिकल सर्वेनुसार ही तीव्रता 5.4 एवढी होती.
फोटो व्हायरल
या भूकंपानंतर रात्रीच्या अंधारातील काही फोटो चीनी सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोत लोक पळताना दिसत आहेत. इमारत, संरक्षक भिंती आणि घरे कोसळल्याने मातीचा ढिगारा रस्त्यावर पडलेला दिसत आहे. लोक अंधारात जीव वाचवण्यासाठी पळताना दिसत आहे. काही लोक एकमेकांना धडकल्याने जमीनवर कोसळले. काही पळताना पडले. त्यामुळे त्यांना मार लागला आहे. फायर फायटर्सना रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी तैनात करण्यात आलं असून ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे.
ट्रेन रोखल्या, गॅस पाईपलाईनचे नुकसान
भूकंपची तीव्रता पाहता ट्रेन रोखण्यात आल्या. रेल्वे ट्रॅकचं इन्स्पेक्शन सुरू आहे. रस्ते वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला आहे. भूकंपाचं केंद्र जमिनीखाली 10 किलोमीटर आत असल्याने भूकंपामुळे मोठं नुकसान झालं असावं असं सांगितलं जात आहे. काही ठिकाणी गॅस पाईपलाईन फुटली आहे. त्यामुळे गॅस पाईपलाईनचा पुरवठा रोखण्यात आला आहे. या पाईपलाईनच्या इन्स्पेक्शनसाठी पथके तैनात करण्यात आले आहेत.
भारतातही भूकंपाचे धक्के
चीनप्रमाणे भारतातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दिल्ली आणि आसपासच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्ली-एनसीआरपासून ते चंदीगड-पंजाबमधील नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्लीतील भूकंपाची तीव्रता 5.8 एवढी नोंदवली गेली आहे. शनिवारी सकाळी जम्मू-काश्मीरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.2 एवढी नोंदवली गेली होती. जूनपासून आतापर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये छोटे मोठे 12 भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.