लग्नात जेवणाच्या गरम कढईत आचारी पडला, 25 वर्षीय तरुणाचा भाजून मृत्यू
उकळत्या सूपमध्ये पडून भाजल्यामुळे तरुणाला 70 टक्के जखमा झाल्या होत्या. त्याला तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान पाच दिवसांनी त्याची प्राणज्योत मालवली
बगदाद : लग्नासाठी जेवण तयार केले जात असतानाच घडलेल्या भयंकर घटनेमुळे आनंद आणि जल्लोषाचं वातावरणच बदलून गेले. जेवणात बनवल्या जाणाऱ्या चिकन सूपच्या कढईत आचारी पडला. गरम सूपमध्ये पडून भाजल्यामुळे 25 वर्षीय तरुणाचा होरपळून मृत्यू झाला. इराकमधील लग्न समारंभावेळी ही घटना घडली. (Iraq chef died after falling into a giant chicken soup vessel he was cooking for a wedding)
नेमकं काय घडलं?
ईशान्य इराकमधील झाखो या जिल्ह्यातील भव्य अशा हेझल हॉल या ठिकाणी लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता. 25 वर्षांचा इसा इस्माईल जेवण बनवणाऱ्या कॅटरर्समध्ये होता. जेवण तयार करतानाच इसाचा पाय घसरला आणि तो उकळत्या चिकन सूपच्या भल्या मोठ्या कढईत पडला.
उपचारादरम्यान मृत्यू
उकळत्या सूपमध्ये पडून भाजल्यामुळे इसाला अंगभर 70 टक्के जखमा झाल्या होत्या. त्याला तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान पाच दिवसांनी त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या पश्चात पत्नी आणि तीन अपत्यं असा परिवार आहे. यामध्ये दोन मुली आणि सहा महिन्यांच्या मुलाचा समावेश आहे.
मोठ्या भांड्यांमध्ये जेवण शिजवण्याची प्रथा
मध्य पूर्वेकडील (Middle East) देशांमधल्या लग्न सोहळ्यात अशाप्रकारे भल्या मोठ्या कढयांमध्ये चिकन सूप बनवण्याची प्रथा आहे. लग्न सोहळ्यांना 200 ते 600 इतक्या संख्येने पाहुण्यांना निमंत्रित केलं जात असल्याने तशी प्रथा पडली. मात्र भल्यामोठ्या भांड्यांमध्ये जेवण तयार करण्याची पद्धत कोणाच्या जीवावर उठेल, असा विचारही कोणी केला नसेल.
इसा गेल्या आठ वर्षांपासून लग्न आणि इतर सण समारंभांसाठी आचारी म्हणून काम करत होता. गेल्या दोन वर्षांपासून तो प्रतिदिन 25 हजार दिनार (अंदाजे 17 डॉलर किंवा 1275 रुपये) इतक्या मेहनतान्यावर काम करत होता. मात्र जेवण करण्याच्या नादात झालेली घाई-गडबड त्याच्या जीवावर बेतली आणि त्याचा परिवारही उघड्यावर आला.
संबंधित बातम्या :
प्रियकराने पेट्रोल ओतून पेटवलं, प्रेयसीने मिठी मारली, मुंबईत तरुणाचा होरपळून मृत्यू
(Iraq chef died after falling into a giant chicken soup vessel he was cooking for a wedding)