israel-palestine : इस्रायलने असं कधीच पाहिलं नव्हतं, रात्रभर अग्नितांडव; मध्यरात्री काय काय घडलं?
इस्रायलमध्ये रात्रभर बॉम्ब वर्षाव करण्यात आला आहे. हमासने गाजापट्टीत एकसाथ 150 रॉकेट डागले. हमासच्या या हल्ल्यात 300हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर पॅलेस्टाईनच्या 230 नागरिकांचा मृत्यू झालाय.
तेल अवीव | 8 ऑक्टोबर 2023 : इस्रायलने यापूर्वी असं कधीच पाहिलं नव्हतं अशा प्रसंगाला सामोरे जावं लागत आहे. पॅलेस्टाईनने अवघ्या 20 मिनिटात इस्रायलवर 5 हजार रॉकेटचा मारा केला. रात्रभर हा रॉकेटचा हल्ला सुरूच होता. त्यामुळे इस्रायलमध्ये रात्रभर अग्नितांडव सुरू होतं. सगळीकडे आग आणि धूरच धूर होता. त्यामुळे इस्रायलचे नागरिक हादरून गेले आहेत. जे कधीच पाहिलं नव्हतं. ते इस्रायलच्या नागरिकांना पाहावं लागत आहे. गेल्या 24 तासात इस्रायलमध्ये 300 नागरिक ठार झाले आहेत. तर गाजामधील 250 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलमधील जखमींची संख्या 3500 वर गेली आहे.
पॅलेस्टाईनच्या हमास या दहशतवादी संघटनेने केवळ इस्रायलवर हल्लाच केला नाही. इस्रायलच्या सैनिकांच्या छावण्यांवर हल्ला करून इस्रायली सैनिकांना ओलीस ठेवले आहे. तसेच इस्रायलच्या नागरिकांचंही अपहरण केलं आहे. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्ष रात्रभर सुरू आहे. दोन्हीकडून रात्रभर रॉकेटचा मारा करण्यात आला आहे. इस्रायलने हमासला जशास तसं उत्तर देण्याचा निर्णय घेतला असून इस्रायलने गाजा पट्टीपर्यंत टँक नेले आहेत. त्यामुळे इस्रायल आज पॅलेस्टाईनचा धुव्वा उडवणार असल्याचं समोर आलं आहे.
जशास तसे उत्तर
पॅलेस्टाईनच्या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी सेनेला जशासतसे उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे इस्रायलच्या सैनिकांनी हमासच्या ठिकाण्यांवर हल्ला करून अतिरेक्यांना मारणं सुरू केलं आहे. हमासच्या अतिरेक्यांचे तळही उद्ध्वस्त केले जात आहेत. इस्रायलने गाजापट्टीत एअरस्ट्राईकही सुरू केली आहे.
पॅलेस्टाईन भयंकर हल्ला करणार
आता इस्रायलने पॅलेस्टाईनवर एकसाथ भयंकर हल्ला करण्याचा प्लान आखला आहे. त्यामुळेच इस्रायलचं सैन्य गाजापट्टीपर्यंत पोहोचलं आहे. हमासने हल्ला करायला नको होता. आता त्यांना मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. हमासने केलेल्या हल्ल्याचा आम्ही बदला घेणार. हा आमच्यासाठी काळा दिवस होता. आमची सेना हमासला उद्ध्वस्त करण्यासाठी प्राणांची आहुती देईल, असं नेतन्याहू यांनी म्हटलं आहे.
नुसरत भरुचाचा संपर्क नाही
दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा ही हायफा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भाग घेण्यासाठी इस्रायलला आली होती. मात्र, युद्ध सुरू झाल्यापासून तिचा काहीच संपर्क होत नाहीये. नुसरतने कुणालाही संपर्क केलेला नाहीये. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. काल दुपारी 12.30 वाजता तिचा शेवटचा संपर्क झाला होता. त्यावेळी ती एका बेसमेंटमध्ये सुरक्षित होती. त्यानंतर तिचा कोणताही मेसेज आला नसल्याचं सांगितलं जात आहे.