इस्रायलचे पंतप्रधान हिजबुल्लाहच्या निशाण्यावर, दुसऱ्यांदा सुरक्षेत मोठी चूक
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्या घराला पुन्हा एकदा लक्ष्य करण्यात आले आहे. वृत्तानुसार, सोमवारी रात्री उशिरा नेतान्याहू यांच्या घराजवळ स्फोटाचा आवाज ऐकू आला. इस्रायलचे हवाई संरक्षण अधिक बळकट करण्यासाठी, अमेरिकेने मध्यपूर्वेमध्ये सर्वात शक्तिशाली हवाई संरक्षण THAAD तैनात केले आहे.
इस्रायल सध्या हमास आणि हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनांसोबत लढत आहे. या दोन्ही संघटनांना नष्ट करण्याची शपथ इस्रायलच्या पंतप्रधानांनी घेतली आहे. या दोन्ही संघटनेंचे प्रमुख इस्रायलच्या हल्ल्यात मारले गेले आहेत. त्यानंतर आता इराण देखील इस्रायलच्या विरोधात मैदानात उतरला आहे. इराणकडून इस्रायलवर १८० हून अधिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली. त्यानंतर इस्रायलने इराणचे लष्करी ठिकाणांना लक्ष्य करत ते उद्धवस्त केले. त्यानंतर इराणकडून पुन्हा एकदा हल्ल्याचा इशारा देण्यात आला आहे. असं असताना महिनाभरात दुसऱ्यांदा नेतान्याहू यांच्या घराला लक्ष्य करण्यात आले आहे.
पॅलेस्टिनी वृत्तसंस्था सामाने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, सोमवारी रात्री उशिरा नेतान्याहू यांच्या घराजवळ स्फोटाचा आवाज ऐकू आला. स्फोटाचे कारण अद्याप समजले नसून प्रकरणाचा तपास सुरू आहे. सोमवारी सकाळी लेबनॉनमधून इस्रायली वसाहती आणि लष्करी सुविधांना लक्ष्य करत 90 रॉकेट डागण्यात आल्याची माहिती इस्रायली माध्यमांनी दिली. मागच्या महिन्यातही हिजबुल्लाने नेतन्याहू यांच्या उत्तर इस्रायलमधील खाजगी घरावर हल्ला केला होता.
नेतान्याहू यांच्या सुरक्षेत दुस-यांदा चूक
19 ऑक्टोबर रोजी इस्रायली मीडियाने सांगितले की नेतन्याहू यांच्या घराला तीन ड्रोनने लक्ष्य केले होते. या हल्ल्यात नेतान्याहू यांच्या घराच्या काही भागाला नुकसान झाले होते. पण तेव्हा नेतान्याहू आणि त्यांची पत्नी घरी नव्हते. त्यामुळे हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही.
हिजबुल्लाह मीडिया कार्यालयाचे प्रमुख मोहम्मद अफिफ यांनी 22 ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आणि सांगितले की आम्ही नेतन्याहू यांच्या घराला तीन ड्रोनने लक्ष्य केले होते, त्यापैकी एकाने घरावर हल्ला केला.
गेल्या महिन्यापासून हिजबुल्लाहच्या हल्ल्यांची अचूकता वाढत आहे. आता हिजबुल्लाहचे सुमारे 20 ते 30 टक्के हल्ले लक्ष्यावर होत आहेत. तर यापूर्वी हा आकडा ५ टक्क्यांपेक्षा कमी होता. हिजबुल्लाहने हैफा शहरावर पत्रकेही टाकली असून तेथील लोकांना विस्थापित करण्याचे आदेश दिले आहेत. या पावलानंतर काही लोकांचा असा विश्वास आहे की हिजबुल्लाह देखील इस्रायलशी मानसिक युद्ध लढत आहे. इस्रायलचे हवाई संरक्षण अधिक बळकट करण्यासाठी, अमेरिकेने मध्यपूर्वेमध्ये सर्वात शक्तिशाली हवाई संरक्षण THAAD तैनात केले आहे.