New delhi : भारत-रशियाचे संबंध आणखी मजबूत, दुनियेत नवी समीकरणं, पुतीन भेटीवर मोदींची प्रतिक्रिया
भारत आणि रशियाचे आर्थिक संबंध दृढ करण्याचे प्रयत्न सुरूच राहणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं आहे. 2025 पर्यंत रशियासोबत 30 बिलियन डॉलरच्या व्यापाराचं टार्गेट ठेवण्यात आलं आहे.
नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्रअध्यक्ष व्लादिमीर पुतीन सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान मोदींची भेट घेतली. रशिया आणि भारत यांच्यातील शांततेची पाच दशके आणि रशिया भारताच्या भागिदारीची 2 दशके पूर्ण होत असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. कोरोनाच्या संकटातही भारत आणि रशियाच्या संबंधामध्ये कोणताही फरक पडला नसल्याचंही मोदींनी म्हटलं आहे. कोविडशी रशिया आणि भारताने एकमेकांच्या सहकार्याने लढा दिला आहे.
आर्थिक संबंध मजबूत करण्यावर भर
इथून पुढेही भारत आणि रशियाचे आर्थिक संबंध दृढ करण्याचे प्रयत्न सुरूच राहणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं आहे. 2025 पर्यंत रशियासोबत 30 बिलियन डॉलरच्या व्यापाराचं टार्गेट ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था मजबूत होण्यास यातून मोठी मदत होणार आहे. तसेच भारताबरोबरच्या व्यापाराचा रशियालाही फायदा होणार आहे.
मोदींनी ट्विट करून पुतीन यांचं स्वागत केलं
पंतप्रधान मोदींनी ट्विट करत रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचं स्वागत केले आहे. माझे मित्र पुतीन यांचं स्वागत आहे, अशा शब्दात मोदींनी पुतीन यांचं वेलकम केलंय. तसेच आजच्या बैठकीतून दोन्ही देशाचे संबंध आणखी मजबूत होणार असल्याचंही मोदींनी म्हटलं आहे. त्यानंतर त्यांनी मेक इन इंडिया अंतर्गत भारत आणि रशियाचे संरक्षणविषयक संबंध दृढ होणार असल्याचंही म्हटलं आहे. पुतीन यांचा हा भारताचा दौरा अत्यंत महत्वपूर्ण मानला जात आहे. जगातील शक्तीशी आणि विकसित देशात रशियाला बघितलं जातं. भारत आणि रशिया काही म्हत्वपूर्ण बाबींवर एकत्र काम करत असल्याचं राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी म्हटलं आहे. गेल्या वर्षी रशिया आणि भारताच्या व्यापारात 17 टक्के घट झाली होती, तर गेल्या 9 महिन्यात व्यापारात 38 टक्के वाढ झाली असल्याचंही पुतीन यांनी सांगितलं आहे.