Narendra Modi in Sydney : सिडनीत मोदी म्हणाले, देशातील डिजिटल क्रांतीने लोकांचे जीवन बदलले
Narendra Modi in Sydney : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी सिडनीतील भारतीय समुदायाच्या एका कार्यक्रमात संबोधित केले. यावेळी त्यांनी भारताने केलेली प्रगती मांडली. त्याचवेळी दोन्ही देशांमधील मैत्रीचा उल्लेख केला.
सिडनी : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. सिडनीतील कुडोस बँक एरिना येथे भारतीय समुदायाच्या एका कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. यावेळी गणपती बाप्पा मोरया, भारत माता की जय आणि मोदी-मोदीच्या घोषणा देण्यात आल्या. कार्यक्रमादरम्यान पीएम नरेंद्र मोदी यांच्या सोबत ऑस्ट्रेलियाचे पीएम अँथनी अल्बानीज देखील उपस्थित होते. सिडनीच्या ऑलिम्पिक पार्कमध्ये असलेल्या या स्टेडियममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० हजार भारतीयांना संबोधित केले. सांस्कृतिक आणि रंगारंग कार्यक्रमाच्या माध्यमातून येथे पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यात आले.
डिजिटल क्रांतीने जीवन बदलले
भारतीय लोकांचे जीवन डिजिटल क्रांतीने बदलले आहे. यामुळे आता सर्वसामान्यांपासून ते मोठ मोठ्या दुकानांपर्यंत डिजिटल क्रांती दिसत आहे. शाळांचे प्रमापपत्रे असो की लायसन्स सर्व डिजिटल लॉकरवर उपलब्ध झाले आहे.
काय म्हणाले नरेंद्र मोदी
- भारतातील प्रत्येक गरिबासाठी माझे स्वप्न होते, ते पूर्ण झाले आहे. सर्व गरीबाचे बँक खाती झाली आहे. देशातील ५० कोटी भारतींयाची खाती उघडली गेली आहे. त्यांना बँकेचे सर्व फायदे मिळत आहे. जनधन बँक खाते, आधार आणि मोबाइलची लिंक केली गेली आहे.
- जगात अनेक देशात बँकींग प्रणाली संकटात आहे. परंतु भारताची बँकींग प्रणालीचे कौतूक होत आहे. भारताने विक्रमी निर्यात केली आहे.
- कोरोनाच्या काळात अनेक देशांना त्यांच्या नागरिकांना पैसे पाठवण्यात अडचणी येत होत्या. पण भारतात हे काम काही क्षणातच झाले. 40% रिअल टाइम डिजिटल पेमेंट एकट्या भारतात होतात. आज फळं, भाजी किंवा पाणीपुरीच्या गाड्या असोत, सगळीकडे डिजिटल व्यवहार होत आहेत.
- जगात जेव्हा जेव्हा संकट येते तेव्हा भारत मदतीसाठी तत्पर असतो. कोणतीही आपत्ती आली तर भारत मदतीसाठी पुढे येतो. आज भारत ग्लोबल ग्रोथच्या जोरावर काम करत आहे. आम्ही जगाला जोडण्यासाठी काम करत आहोत. सर्वांचा पाठिंबा, सर्वांचा विकास, सर्वांचा विश्वास आणि सर्वांचे प्रयत्न… हाच आपल्या सरकारचा आधार आहे. ही आमची दृष्टी आहे.
- क्रिकेट आपल्याला वर्षानुवर्षे जोडत आहे. पण आता टेनिस आणि चित्रपटही आपल्याला जोडत आहेत. आमची खाण्याची पद्धत जरी वेगळी असली तरी आता मास्टर शेफ आम्हाला जोडत आहेत. ऑस्ट्रेलियाने भारताची ही विविधता खुल्या मनाने स्वीकारली आहे.
- भारतात जेव्ही तुम्ही येणार तुमच्या सोबत ऑस्ट्रेलियन मित्रांना घेऊन या. यामुळे त्यांना भारतातील संस्कृती जवळून पाहत येईल. त्यांना भारत समजून घेता येईल.