आक्रोश… आक्रोश आणि आक्रोश… झोपेतच 600 जणांचा मृत्यू; 4 देशात शक्तीशाली भूकंपाने मृत्यूचं तांडव
तुर्कीतील या भूकंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या संकटाच्या प्रसंगी भारत तुर्कीच्या सोबत आहे. आम्ही तुर्कीला पाहिजे ती मदत करू. तुर्कीतील भूकंपावर आम्ही सर्व लक्ष ठेवून आहोत.
अंकारा : तुर्कीत आज पहाटे भूकंपाचा तीव्र झटका जाणवला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.8 एवढी नोंदवली गेली. एक नव्हे तर चार देशात हे भूकंपाचे झटके जाणवले आहेत. या भूकंपामुळे तुर्की आणि सीरियामध्ये 600 लोकांचा मृत्यू झाला. तुर्कीत सौदी अरेबियातील सात नागरिकांचा मृत्यू झाला आहे. लोक गाढ झोपेत असतानाच हा भूकंप झाल्याने अनेकांचा झोपेतच मृत्यू झाला. या भूकंपामुळे कमीत कमी 150 इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. या भूकंपाचे व्हिडीओ व्हायरल झाले असून त्यातून भूकंपाची दाहकता दिसून येते.
तुर्कीत आज पहाटे 4 वाजून 17 मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला. त्यामुळे अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या. या इमारतीखाली अनेक लोक दबले गेले आहेत. त्यामुळे या लोकांना बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे.
केवळ तुर्कीच नव्हे तर इस्रायल, पॅलेस्टाईन, सायप्रस, लेबनान आणि इराकमध्येही भूकंपाचे झटके जाणवले आहेत. तुर्की आणि ईराणच्या सीमेवर यापूर्वी भूकंप आला होता. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.9 इतकी नोंदवली गेली होती.
सीरियात 100 हून अधिक दगावले
या भूकंपामुळे एकट्या सीरियात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेच्या अंदाजानुसार तुर्की आणि सीरियातील भूकंपामुळे मृतांचा आकडा 1 हजार लोक दगावल्याचं सांगितलं जात आहे.
मालात्या प्रांतात सर्वाधिक नुकसान
भूकंप झाल्याबरोबर ज्या भागात अधिक नुकसान झालं तिथे ताबडतोब बचाव पथके पाठवण्यात आले. या संकटात कमीत कमी नुकसान होईल अशी आशा आहे, असं तुर्कीचे राष्ट्रपती रजब तैयब एर्दोगन यांनी सांगितलं. 1999मध्ये उत्तर पश्चि तुर्कीत भूकंप झाला होता. त्यावेळी 18 हजार लोकांचा मृत्यू झाला होता.
A Massive 7.8 Magnitude Earthquake has struck Central Turkey within the last hour, Severe Damage and multiple Casualties are being reported across the Region. pic.twitter.com/qILgKNAHMK
— OSINTdefender (@sentdefender) February 6, 2023
मिळालेल्या माहितीनुसार, तुर्कीच्या मालात्या प्रांतात 23 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 130 इमारती कोसळल्या आहेत. तर सनलीउर्फा येथे 17, दियारबकिर येथे 6 आणि उस्मानियेमध्ये 5 लोकांचा मृत्यू झाला आहे.
भारत तुर्कीच्या पाठी
तुर्कीतील या भूकंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या संकटाच्या प्रसंगी भारत तुर्कीच्या सोबत आहे. आम्ही तुर्कीला पाहिजे ती मदत करू. तुर्कीतील भूकंपावर आम्ही सर्व लक्ष ठेवून आहोत. या भूकंपामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तुर्कीतील आसपासच्या देशातही नुकसान झाल्याचं समजतं. भारत भूकंप पीडितांना हवी ती मदत करेल, असं मोदी यांनी म्हटलं आहे.