Pakistan: आमिर लियाकत सैतानापेक्षाही भयंकर, 31 वर्षाने लहान असलेल्या पत्नीने मागितला घटस्फोट, 11.5 कोटी, घर आणि दागिण्यांची मागणी
Pakistan: सैयदा यांनी कुटुंब न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. मेहर हक म्हणून 11.5 कोटी रुपये मिळावेत.
लाहोर: पाकिस्तानातील पीटीआय पार्टीचे खासदार आणि प्रसिद्ध टीव्ही होस्ट आमिर लियाकत (Aamir Liaquat Hussain) यांची तिसरी पत्नी सैयदा दानिया शाह (Syeda Dania Shah) यांनी तलाक (divorce) मागितला आहे. सैयदा यांनी खुला (तलाक घेण्याचा महिलांचा अधिकार)साठी अर्ज दाखल केला आहे. आमिर टीव्हीवर दिसतात तसे नाहीयेत. ते सैतानापेक्षाही भयंकर आहेत, असा आरोप सैयदा यांनी लगावला आहे. तसेच घटस्फोटापोटी सैयदा यांनी आमिर यांच्याकडून 11.5 कोटी रुपये, घर आणि दागिण्यांची मागणी केली आहे. त्यामुळे आमिर आणि सैयदा यांच्या घटस्फोटाचं प्रकरण सध्या पाकिस्तानात चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे आमिर यांच्याकडून काय युक्तिवाद केला जातो आणि कोर्ट आता या प्रकरणावर काय निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सैयदा यांनी या याचिकेत पतीशी असलेल्या संबंधावरही भाष्य केलं आहे. आमिरशी विवाह करून मला चार महिने झाले आहेत. या चार महिन्यात वेदना आणि त्रासाशिवाय मला काहीही मिळालेलं नाही. आमिर मला एका छोट्या रुममध्ये ठेवत होते. तसेच नशेत मला मारहाण करत असतात. या प्रकाराची वाच्यता केली तर गंभीर परिणामांना सामोरे जावं लागेल, अशी धमकी आमिर मला आणि माझ्या कुटुंबीयांना देत आहेत, असा दावा सैयदा यांनी या याचिकेत केला आहे.
7 जून रोजी सुनावणी
सैयदा यांनी कुटुंब न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. मेहर हक म्हणून 11.5 कोटी रुपये मिळावेत, घर आणि दागिणे देण्यात यावेत, तसा आदेश आमिरला देण्यात यावा, असं सैयदा यांनी याचिकेत म्हटलं आहे. कोर्टाने सैयदा यांची याचिका दाखल करून घेतली आहे. त्यावर येत्या 7 जून रोजी सुनावणी होणार आहे.
31 वर्षाने लहान
आमिर शाह लियाकत आणि सैयदा दानिया यांचा विवाह याच वर्षी फेब्रुवारीत झाला होता. आमिर यांचं वय 49 वर्ष आहे. तर सैयदा या 18 वर्षाच्या आहेत. त्यामुळे हे लग्न चर्चेत आलं होतं. आमिर यांनी आपल्यापेक्षा 31 वर्ष लहान असलेल्या मुलीशी विवाह केल्याने सोसश मीडियावर आमिर ट्रोल झाले होते.
लोकप्रिय होस्ट
आमिर लियाकत खासदार आहेत. त्याच प्रमाणे ते पाकिस्तानातील लोकप्रिय टीव्ही होस्ट आहेत. तसेच माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे ते अत्यंत जवळचे मानले जातात. आमिर लियाकत सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. त्यांना फॉलो करणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे.