यांचेच खायचे वांदे आणि हे करणार मालदीवला मदत, भारताशी संबंध बिघडताच धावला पाकिस्तान
India-maldive row : भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध काहीसे बिघडले असताना याचा फायदा घेण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून होत आहे. पाकिस्तानने मालदीवला आर्थिक सहाय्य करण्याचे आश्वासन दिले आहे. जो देश आधीच अडचणीत आहे तो काय इतरांना मदतीचं आश्वासन देतोय अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
India maldive r0w : भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध काही प्रमाणात बिघडल्यानंतर आता इतर देश संधी शोधत आहेत. मालदीव आणि भारत यांच्यातील संबंध अनेक दिवसांपासून चांगले राहिले आहेत. पण नवीन सरकार येताच त्यांनी भारत विरोधी भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. मालदीवचे राष्ट्राध्यक्षांनी भारतीय जवांनाना देखील माघारी बोलवण्याची मागणी केली आहे. पंतप्रधान मोदींच्या ट्विटवर मालदीवच्या तीन मंत्र्यांनी आक्षेपार्ह कमेंट केली होती. त्यानंतर तीन्ही मंत्र्यांची पदावरुन हकालपट्टी करण्यात आली होती. भारतीयांनी देखील याविरोधात मालदीवरचा दौरा रद्द केला होता. मालदीव सोबतचा तणाव पाहताच पाकिस्तान मालदीवच्या समर्थनार्थ पुढे आला आहे. पाकिस्तानने मालदीवला आर्थिक सहाय्य देण्याचे आश्वासन दिले आहे.
पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर उल हक काकर यांनी मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्याशी फोनवरुन चर्चा केली आहे. यावेळी त्यांनी मालदीव-पाकिस्तान द्विपक्षीय संबंध दृढ करण्यावर त्यांनी भर दिला.
भारताने दिला झटका
भारताने मालदीवला दिलेली आर्थिक मदत सुमारे 22% कमी केली आहे. 2024-25 आर्थिक वर्षात मालदीवच्या विकासासाठी केवळ 600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर 2023-24 मध्ये सरकारने मालदीवला 770.90 कोटी रुपयांची मदत दिली होती. ही मदत परराष्ट्र मंत्रालयामार्फत मालदीवमध्ये विविध योजनांतर्गत पोहोचवली जाते.
भारत-मालदीव संबंधात तणाव
मालदीवचे नवे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू हे चीनचे समर्थक म्हटले जाते. ते पदावर येताच भारत आणि मालदीवमधील संबंध बिघडले आहेत. मोहम्मद मुइज्जू यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारात इंडिया आउटचा नारा दिला होता. सत्तेवर आल्यानंतर मुइझूने मालदीवमध्ये उपस्थित असलेल्या भारतीय सैन्याला माघार घेण्याचे आदेश दिले. भारतासोबतचा हायड्रोग्राफिक सर्व्हे करार संपुष्टात आणण्याची देखील त्यांनी घोषणा केली होती. यामुळे तणाव आणखी वाढत गेला.
भारतीयांनी देखील यानंतर चांगलीच आक्रमक भूमिका घेतली. भारतीयांनी मालदीवला न जाता लक्षद्वीप दौऱ्याचा प्लान केला. त्यामुळे मालदीवच्या पर्यटनाला मोठा झटका लागला. कारण मालदीवला जाणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या सर्वाधिक होती.