मध्यरात्री पाकिस्तानची संसद बरखास्त, राष्ट्रपतींचा मोठा निर्णय; पाकमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी
पाकिस्तानच्या संविधानानुसार संसद भंग झाल्यानंतर पंतप्रधान आणि नॅशनल असेंबलीच्या विरोधी पक्षनेत्याने तीन दिवसात हंगामी पंतप्रधानांचं नाव राष्ट्रपतीकडे सूचवायचं असतं.
कराची | 10 ऑगस्ट 2023 : पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी बुधवारी मध्यरात्री पाकिस्तानची संसद बरखास्त केली आहे. संसदेचं कनिष्ठ सभागृह असलेल्या नॅशनल असेंबलीचा पाच वर्षाचा संवैधानिक कार्यकाळ पूर्ण होण्याच्या तीन दिवस आधीच संसद बरखास्त करण्यात आली आहे. त्यामुळे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या सरकारचा कार्यकाळही संपुष्टात आला आहे.
संसद बरखास्त करण्यात आलेल्या नोटिफिकेशनमध्ये महत्त्वाच्या गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत. नॅशनल असेंबली संविधानाच्या आर्टिकल 58च्या नुसार भंग करण्यात आली आहे. संसदेचा पाच वर्षाचा कार्यकाळ अधिकृतरित्या 12 ऑगस्ट रोजी संपुष्टात येणार होता, असं या नोटिफिकेशन्समध्ये म्हटलं आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज यांनी राष्ट्रपती अल्वी यांना पत्र लिहून संसद भंग करण्याची शिफारीश केली होती. आर्टिकल 58नुसार राष्ट्रपतीने पंतप्रधानांच्या शिफारशीनुसार 48 तासात संसद बरखास्त केली नाही तर 48 तासानंतर संसद आपोआपच भंग होते.
हंगामी पंतप्रधान ठरणार
दरम्यान, पाकिस्तानच्या संविधानानुसार संसद भंग झाल्यानंतर पंतप्रधान आणि नॅशनल असेंबलीच्या विरोधी पक्षनेत्याने तीन दिवसात हंगामी पंतप्रधानांचं नाव राष्ट्रपतीकडे सूचवायचं असतं. त्यानुसार पंतप्रधान शरीफ आणि विरोधी पक्षनेत्याकडे केअर टेकर पंतप्रधानांचं नाव सूचवण्यासाठी तीन दिवस बाकी आहेत. जर केअरटेकर पंतप्रधानांच्या नावावर सहमती झाली नाही तर असेंबली स्पीकरद्वारे तयार करण्यात आलेल्या समितीकडे हे प्रकरण जातं. या समितीला तीन दिवसात नव्या केअरटेकर पंतप्रधानांचं नाव सूचवणं बंधनकारक असतं.
निवडणूक आयोगालाही अधिकार
मात्र, समितीलाही तीन दिवसात केअरटेकर पंतप्रधानांचं नाव सूचवता आलं नाही तर केअरटेकर पंतप्रधानांच्या दावेदारांची नावे निवडणूक आयोगाकडे पाठवली जातात. निवडणूक आयोग त्यावर दोन दिवसात निर्णय घेते.
विरोधी पक्षनेत्यांना भेटणार
यापूर्वी पंतप्रधान शरीफ यांनी बुधवारी संसदेच्या कनिष्ठ सभागृहात निरोपाचं भाषण केलं होतं. हंगामी पंतप्रधानांच्या नावावर चर्चा करण्यासाठी गुरुवारी म्हणजे आज विरोधी पक्षनेते राजा रियाज यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.