रशिया-युक्रेन युद्धाचा महाराष्ट्रालाही फटका, एमबीबीएसे विद्यार्थी अडकले, पालकांना घोर
युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या आणि नोकरीसाठी तिथं वास्तव्यास असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना भारतात आणण्यास भारताहून गेलेलं विमान गुरूवारी रिकामं परतलं.
पुणे – युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या आणि नोकरीसाठी तिथं वास्तव्यास असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना भारतात आणण्यास भारताहून गेलेलं विमान गुरूवारी रिकामं परतलं. त्यामुळे तिथं अडकलेल्या विद्यार्थी आणि नोकरदारांनी चिंता व्यक्त केली आहे. युक्रेनच्या राष्ट्रपतीनी तिथं राष्ट्रपती ‘मार्शल लॉ’ (martial law in ukraine) लागू केल्यानंतर तिथली हवाई यंत्रना पुर्णपणे बंद केल्याचे जाहीर केले. त्यामुळे भारताहून (india) पाठवलेलं विमान रिकाम परतलं आहे. रशियाकडून युक्रेनच्या (Russia Ukraine) लष्करी साठ्यावरती नेहमी बॉम्ब हल्ले होत असल्याने अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर अनेकांचे नातेवाईक किंवा मुलं युक्रेनमध्ये असल्याने चिंतेत आहेत. पुण्यातील जिल्हाधिकारी यांनी नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असल्यास कार्यालयाशी संपर्क साधावा असं जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेश देशमुख यांनी केले आवाहन यांनी केलं आहे.
नांदेडचे 7 विद्यार्थी युक्रेन अडकले
युक्रेन देशात नांदेडचे सात विद्यार्थी असून ते सुरक्षित असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यानी दिली आहे. त्याचबरोबर सध्या, युद्ध सुरू असलेल्या युक्रेनमध्ये नांदेडचे सात विद्यार्थी एमबीबीएसच्या शिक्षणासाठी तिथे वास्तव्यास आहेत. त्यात सहा तरुण आणि एका तरुणीचा समावेश आहे. हे सगळे विद्यार्थी सुरक्षित असल्याची माहिती त्यांच्या पालकांनी दिल्याचे जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी सांगितली आहे. याशिवाय अन्य तिथे कुणी अडकले असेल तर त्यांनी जवळच्या तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
रायगडमधील 18 विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले
रायगड जिल्ह्यातील एकूण 18 विद्यार्थी हे युक्रेन मध्ये अडकले असून हे सर्व विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी रायगड जिल्ह्यातून युक्रेनला वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी मध्ये एम बी बी एस चे शिक्षण घेत आहेत. त्यातील 5 विद्यार्थी हे एका युनिव्हर्सिटी मध्ये तर 2 विद्यार्थी हे एक युनिव्हर्सिटी मध्ये शिकत असून उर्वरित 11 विद्यार्थी हे वेगवेगळ्या युक्रेनच्या विद्यापीठात एम. बी. बी. एस चे धडे गिरवत आहेत. कर्जत मधील 2, पेण मधील 5, खोपोलीतील 1, महाड मधील 1 अलिबाग मधील 1 तळातील 1, नागोठणे मधील 1, मोहपाडा येथील 1 माणगांव मधील एक तर पनवेल मधील 3 विद्यार्थी हे उच्च शिक्षणासाठी गेले आहेत. युक्रेनमध्ये शिक्षण घेत असलेल्या विजया माने या विद्यार्थ्यांनीचे वडील मल्हारी माने सांगतायत की ती सुरक्षित असून आपलं भारत सरकार तिची काळजी घेत आहे.
नाशिकचे 2 विद्यार्थी अडकले
युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर, नाशिकचे 2 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याचं समोर आलं आहे. नाशिकच्या जेल रोड परिसरात राहणारे अदिती देशमुख आणि प्रतीक जोंधळे असं दोघांचं नाव आहे. वैद्यकीय अभ्यासासाठी हे दोन्ही विद्यार्थी युक्रेन मध्ये गेले होते. मुलांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासन विभागाला दोघांची माहिती दिली असून, दोघेही विद्यार्थी सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.