Salman Rushdie Health Update: सलमान रश्दींचं व्हेंटिलेटर काढलं, हल्लेखोर म्हणतो, मी गुन्हा केलाच नाही
Salman Rushdie Health Update: रश्दी यांचं यकृत खराब झालं होतं. त्यांच्या एका हाताची आणि डोळ्याची नस तुटली होती. त्यांच्या डोळ्याला बराच मार लागला होता. त्यांचा डोळा निकामी होऊ शकतो, असं रश्दी यांचे एजंट वायली यांनी सांगितलं.
न्यूयॉर्क: प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी (Salman Rushdie) यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होताना दिसत आहे. रश्दी यांचं व्हेंटिलेटर काढण्यात आलं आहे. ते आता बोलू शकत असल्याचं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं. रश्दी यांच्यावर शुक्रवारी जीवघेणा हल्ला झाल होता. न्यूयॉर्क (New York) येथे एका कार्यक्रमाला संबोधित करण्यासाठी उभे राहिले असता एका तरुणाने स्टेजवर येऊन त्यांना धक्काबुक्की केली. त्यानंतर या तरुणाने चाकू काढून रश्दी यांच्यावर सपासप वार केले. मान, पोट आणि छातीवर वार झाल्याने रश्दी काही क्षणात रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळले होते. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात (hospital) दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर तातडीने सर्जरी करण्यात आल्याने ते सुदैवाने बचावले. मात्र, त्यांचा एक डोळा निकामी होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, सलमान रश्दींचे एजंट अँड्र्यू वायली यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. रश्दी यांचं व्हेंटिलेटर हटवण्यात आलं आहे. आता ते बोलू शकतात, असं वायलीने म्हटलं आहे. दरम्यान, न्यूयॉर्क पोलिसांनी हल्लेखोर हादी मतार याला अटक केली आहे. त्याला काल रिमांडवर चौटाउक्वा काऊंटी जेलमध्ये पाठवण्यात आलं. मात्र, मातर याने कोर्टात आपण दोषी नसल्याचं म्हटलंआहे. आपल्यावरील आरोप त्याने फेटाळून लावले आहेत.
आरोपीचे वकील काय म्हणाले?
पब्लिक डिफेंडर नथानिएल बॅरोन यांनी मातरची बाजू मांडली. आरोपीला न्यायाधीशासमोर हजर करण्यास बराच उशीर करण्यात आला. त्याला बराच काळ तुरुंगात ठेवण्यात आलं. त्याला आपलं निर्दोषत्व सिद्ध करण्याचा अधिकार आहे, असं नथानिएल यांनी सांगितलं. रश्दी यांचं यकृत खराब झालं होतं. त्यांच्या एका हाताची आणि डोळ्याची नस तुटली होती. त्यांच्या डोळ्याला बराच मार लागला होता. त्यांचा डोळा निकामी होऊ शकतो, असं रश्दी यांचे एजंट वायली यांनी सांगितलं.
नेमकं काय घडलं?
सलमान रश्दी परवा न्यूयॉर्कमधील एका कार्यक्रमात लेक्चर देण्यासाठी आले होते. या कार्यक्रमासाठी पासेस देण्यात आले होते. मातर याच्याकडेही कार्यक्रमाची पास होती. त्यामुळे तोही कार्यक्रमाला उपस्थित राहिल होता. रश्दी जेव्हा भाषणासाठी उभे राहिले तेव्हा मातर याने स्टेजवर येऊन रश्दींशी वाद घातला. त्यानंतर त्याने रश्दी यांना ठोसे लगावले. नंतर रश्दी यांच्या पोटावर, मानेवर आणि डोळ्यावर वार केले. त्यामुळे रश्दी हे रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. त्यांचे हात रक्ताने माखले होते. या खूनी हल्ल्यानंतर कार्यक्रमात एकच घबराट पसरली. लोक सैरावैरा पळू लागले. त्यानंतर रश्दी यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्यांचा एक डोळा निकामी होण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली. दरम्यान, या प्रकरणी मातरला पोलिसांनी अटक केली आहे.