किल्लारीच्या भूकंपा एवढाच भूकंप, 30 सेकंद धरणी हलली; तुर्की नव्हे या ठिकाणी झाला धरणीकंप
सागरी वादळामुळे न्यूझीलंडच्या समुद्रात आक्राळविक्राळ लाटा उसळत आहेत. अनेक भागात प्रचंड पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे अनेक भागात भूस्खलन होताना दिसत आहे. तर महापुरांमुळे घरे वाहून गेली आहेत.
वेलिंग्टन: लातूरच्या किल्लारीत झाला होता, तेवढ्याच तीव्रतेचा भूकंप न्यूझीलंडमध्ये झाला आहे. न्यूझीलंडमध्ये 6.1 तीव्रतेचा भूकंप झाला आहे. या भूकंपामुळे तब्बल 30 सेकंद धरणी हल्ली. भूकंपाचे झटके वेलिंग्टनच्या दोन्ही बेटांवर जाणवले आहेत. त्यामुळे येथील नागरिक भयभीत झाले आहेत. भूकंपाने झालेल्या हानीची माहिती अद्याप आलेली नाही. मात्र, तुर्कीनंतर आता न्यूझीलंडला भूकंपाचा हादरा बसल्याने जगभर चिंता व्यक्त केली जात आहे.
न्यूझीलंडमधील वेळेनुसार आज 12 वाजून 8 मिनिटांनी भूकंपाचे झटके जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या आत 74.3 किलोमीटर आत आहे. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.1 एवढी नोंदवली गेली आहे.
वादळाचा धोका
न्यूझीलंडच्या डोक्यावर आठवड्याभरापासून सायक्लोन गॅब्रियल या वादळाचा धोका घोंघावत आहे. या वादळामुळे न्यूझीलंडमध्ये अनेक ठिकाणी वादळी पाऊसही झाला आहे. त्यामुळे न्यूझीलंडच्या अनेक भागात महापूर आला आहे.
वादळ आणि महापुरामुळे न्यूझीलंडमध्ये हाहाकार माजला असून परिस्थिती इतकी भीषण झालीय की संपूर्ण देशात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. न्यूझीलंडच्या 6 क्षेत्रांमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. हे संकट सुरू असतानाच आता भूकंपाचा तीव्र झटका बसल्याने न्यूझीलंडचे नागरिक भयभीत झाले आहेत.
भूस्खलन
सागरी वादळामुळे न्यूझीलंडच्या समुद्रात आक्राळविक्राळ लाटा उसळत आहेत. अनेक भागात प्रचंड पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे अनेक भागात भूस्खलन होताना दिसत आहे. तर महापुरांमुळे घरे वाहून गेली आहेत. त्यामुळे नागरिक चांगलेच धस्तावून गेले आहेत.
लातूरमध्ये काय झाले होते?
लातूरच्या किल्लारीत 1993 भूकंप झाला होता. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.4 एवढी नोंदवली गेली होती. या भूकंपात सुमारे 7 हजाराहून अधिक लोक दगावले होते. तर 15 हजाराहून अधिक जनावरांचा मृत्यू झाला होता. भूकंपामुळे 1600 हून अधिक लोक जखमी झाले होते. तर लातूरमधील 52 गावांतील 30 हजार घरे जमीनदोस्त झाली होती.