अमेरिकेत कोरोनाचा उद्रेक, एका दिवसात 14 लाखांहून अधिक रुग्ण, फ्रान्स- स्वीडनमध्येही हाहाःकार
अमेरिकेपासून युरोपपर्यंत सर्वत्र कोरोनाचा उद्रेक सुरु आहे. अनेक देशांमध्ये विक्रमी संख्येत कोरोनाची प्रकरणे समोर आली आहेत. पुढील दोन महिन्यात, युरोपमधील निम्म्या लोकसंख्येला ओमिक्रॉनचा संसर्ग होण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे. जाणून घ्या काय आहे जगाची स्थिती...
वॉशिंग्टन : अमेरिकेत कोरोनाच्या (Corona) रुग्णांची विक्रमी संख्येने नोंद झाली आहे. सोमवारी (10 जानेवारी) अमेरिकेत 14 लाखांहून अधिक कोरोना केसेस नोंदवण्यात आल्या आहेत. यापूर्वी कधीही अमेरिकेत किंवा जगातील इतर कोणत्याही देशात इतक्या संख्येने रुग्ण नोंदवले गेले नव्हते. देशात ओमिक्रॉन (Omicron) व्हेरिएंट आणि डेल्टाचा धोका अजिबात कमी होताना दिसत नाही. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या (Johns Hopkins University) ट्रॅकरनुसार, यूएसमध्ये 14,81,375 नवीन कोव्हिड – 19 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर यापूर्वी 3 जानेवारी रोजी 11.7 लाख प्रकरणे नोंदवली गेली होती.
यासह, अमेरिकेतील एकूण कोरोना प्रकरणांची संख्या आता 6,15,58,085 झाली आहे. तर सोमवारी 1,906 मृत्यू झाल्यानंतर एकूण मृतांची संख्या 8.39,500 वर पोहोचली आहे. सोमवारी जास्तीत जास्त प्रकरणे नोंदवली गेली. ज्या दिवशी कोरोनाची विक्रमी आकडेवारी समोर आली, त्याच दिवशी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांच्या संख्येनेही विक्रम मोडला. अवघ्या तीन आठवड्यांत हा आकडा दुप्पट झाला आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे 1,41,000 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याआधी गेल्या वर्षी जानेवारीमध्ये हा आकडा 1,32,051 एवढा विक्रमी होता.
फ्रान्समध्येही ‘रेकॉर्डब्रेक’
फ्रान्सच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितल्यानुसार तेथे 24 तासांत विक्रमी 3,68,149 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. शुक्रवारनंतर स्वीडनमध्ये विक्रमी 70,641 प्रकरणे नोंदवली गेली. यादरम्यान 54 मृत्यूंचीही नोंद झाली आहे. दुसरीकडे, जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) म्हणणे आहे, की जर येत्या दोन महिन्यांपर्यंत संसर्गाची प्रकरणे अशीच समोर येत राहिली तर युरोपमधील निम्म्याहून अधिक लोकसंख्येला ओमिक्रॉनची लागण होऊ शकते. यासह, फ्लूसारख्या किरकोळ आजार म्हणून ओमिक्रॉनवर उपचार करणे खूप घाइचे असल्याचेही ‘डब्ल्यूएचओ’ने सांगितले आहे.
ऑस्ट्रेलियातही प्रकरणे वाढली
ऑस्ट्रेलियातही परिस्थिती नियंत्रणात नाही. न्यू साउथ वेल्समध्ये, एका दिवसात 34,759 प्रकरणे नोंदवली गेलीत तर, 2,242 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. व्हिक्टोरिया राज्यात 40,127 प्रकरणे नोंदवली गेली असून रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या 946 होती. दोन्ही राज्यात 21 मृत्यूंची नोंद झाली आहे. आता न्यू साउथ वेल्समध्ये, एखाद्याने कोरोनाच्या बाधित अहवालाची माहिती दिली नाही, तर त्याला 1000 डॉलरचा दंड देखील ठोठावला जाईल. ब्रिटनबद्दल बोलायचे झाले तर येथे 24 तासांत 1,20,821नवीन रुग्ण आढळले आहेत आणि या कालावधीत 379 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथे 4 जानेवारीपासून केसेसमध्ये सातत्याने घट होत आहे. त्यानंतर 2,18,376 प्रकरणे दाखल झाले आहे.
इतर बातम्या
Corona, Omicron Cases Maharashtra LIVE : पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रे बंद