धक्कादायक! विदेश प्रवास ना लोकांशी भेटगाठ तरीही या राज्यात 60 टक्के लोकांना ओमिक्रॉन….
दिल्लीत एकूण बाधितांपैकी 60 टक्क्यांहून अधिक लोकांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. विशेष म्हणजे एका अभ्यासानुसार या लोकांना कुठल्या विदेश प्रवासाही हिस्ट्री नाही वा ते कुठल्याही बाधिताच्या संपर्कात देखील आलेले नाहीत.
मुंबई : देशासह जगभरात कोरोनाचा नवीन व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. देशात दिवसेंदिवस ओमिक्रॉनने बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे दिल्लीत ओमिक्रॉनवर झालेल्या अभ्यासातून (Coronavirus Study) एक नवीन चिंता व्यक्त करणारी बातमी समोर आली आहे. दिल्लीतील ओमिक्रॉन (omicron) संक्रमितांपैकी केवळ 39.1 टक्के लोक विदेशात गेले आहेत किंवा ते कोरोना बाधितांच्या संपर्कात आले आहेत. म्हणजेच एकूण संक्रमितांपैकी 60 टक्के लोकांनी विदेशात प्रवास केलाच नाही किंवा ते कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेलेदेखील नाही. यातून ओमिक्रॉन हा कोरोनाचा नवीन व्हेरिएंट किती वेगाने पसरतोय याचा अंदाज आपण बांधू शकतो.
देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत एक नवीन अभ्यास (Coronavirus Study) समोर आला आहे, ज्याचे निष्कर्ष धक्कादायक आहेत. दक्षिण आफ्रिकामध्ये ओमिक्रॉन हा कोरोनाचा एक नवीन प्रकार दिसून आला होता. त्यानंतर तो जगभरात पसरला. या संसर्गाच्या झपाट्याने पसरण्याला विदेश प्रवास कारणीभूत असल्याचे सांगण्यात आले. भारतातही विदेशातून परतलेल्या अनेक लोकांमध्ये ओमिक्रॉनचा संसर्ग आढळून आला. पण दिल्लीच्या ओमिक्रॉन संसर्गाचा अभ्यासाने आता चिंता वाढवली आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत, कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन प्रकाराची लागण झालेल्या 60 टक्क्यांहून अधिक लोकांनी विदेशात प्रवास केला नाही किंवा ते आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संपर्कात आले नाहीत. दिल्ली सरकारच्या इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर अँड बिलीरी सायन्सेस (ILBS) ने केलेल्या अभ्यासात या गोष्टी समोर आल्या आहेत.
समुहसंसर्ग सांगणारा पहिला अभ्यास
भारतात ओमिक्रॉन या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचा सुमहसंसर्ग झाल्याचा अहवाल देणारा कदाचित हा पहिल्या अभ्यास असल्याचा दावा करण्यात येत आहे. या अंतर्गत, दिल्ली, दक्षिण दिल्ली, दक्षिण-पूर्व, दक्षिण-पश्चिम, पश्चिम आणि पूर्व दिल्ली या पाच जिल्ह्यांमधून गेल्या वर्षी 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर दरम्यान संकलित केलेल्या संसर्ग प्रकरणांचा जीनोम अनुक्रम डेटा पाहिला गेला. पाच जिल्ह्यांतील विविध चाचणी प्रयोगशाळांमधून एकूण 332 नमुने आयएलबीएसकडे पाठविण्यात आले आणि त्यापैकी 264 नमुने गुणवत्ता चाचणी उत्तीर्ण झाले आहेत.
39.1 टक्के लोकांनी विदेशात प्रवास केला
264 नमुन्यांपैकी, 68.9 टक्के डेल्टा आणि त्याअंतर्गत असलेल्या व्हेरिएंटची लागण झाल्याचे आढळले, तर उर्वरित 82 नमुने (31.06 टक्के) ओमिक्रॉनने संक्रमित झाले. 82 प्रकरणांपैकी 46.3 टक्के प्रकरणे एकूण 14 कुटुंबांशी संबंधित आहेत आणि यापैकी केवळ चार कुटुंबे विदेशात गेले होते. विदेशात प्रवास न केलेल्या उर्वरित 10 कुटुंबांपैकी तीन कुटुंबांना प्रवास न केलेल्या कुटुंबातील सदस्याच्या संपर्कात आल्याने संसर्ग झाला होता. अभ्यासानुसार, सात कुटुंबातील उर्वरित 20 व्यक्तींना समुहाच्या प्रसारामुळे संसर्ग झाला असावा. अभ्यासानुसार, ओमिक्रॉन संक्रमित लोकांपैकी केवळ 39.1 टक्के लोक विदेशात गेले होते किंवा आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संपर्कात आले होते. या सर्व अभ्यासातून ओमिक्रॉन संसर्ग समुदायाच्या प्रसाराद्वारे उर्वरित लोकांमध्ये पसरल्याचे यातून अधोरेखीत करण्यात येत आहे.
त्रिसूत्रीचा वापर आवश्यक
देशभरात ओमिक्रॉनचा प्रसार वेगाने वाढत असला तरी नागरिकांनी कोरोनाविरुध्द त्रिसूत्रीचा वापर अवश्य करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे. मास्क वापरा, वारंवार हात धुवा व शारीरिक अंतर पाळल्यास कोरोनापासून बचाव करता येणे शक्य आहे. सुरुवातीला ओमिक्रॉन व्हेरिएंटपासून बचाव करण्यासाठी विमानतळे आदी ठिकाणी कठोर नियमांची अंमलबजावणी करुन त्या ठिकाणी चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली होती. परंतु भारतातही ओमिक्रॉनच्या केसेस् वाढल्यानंतर सर्वच ठिकाणी चाचण्या वाढवून ओमिक्रॉनला आळा घालण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. डेल्टाच्या तुलनेत ओमिक्रॉन कमी घातक असल्याचा दावा सर्वच अभ्यासकांकडून करण्यात येत असला तरी त्याचा प्रसाराचा वेग पाहता ओमिक्रॉनला रोखण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.
इतर बातम्या :
Corona, Omicron Cases Maharashtra LIVE: राष्ट्रवादीचे माजी आमदार अमरसिंह पंडित कोरोना पॉझिटिव्ह
Startup India: 16 जानेवारी हा दिवस ‘नेशनल स्टार्ट-अप डे’ म्हणून साजरा करणार; पंतप्रधान मोदींची घोषणा