सरकारी नोकरीसाठी आता एकच फॉर्म, मोदी सरकारचा निर्णय
केंद्र सरकारने नोकर भरती प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला (Common Eligibility Test).
नवी दिल्ली : केंद्र सरकारने नोकर भरती प्रक्रियेत महत्त्वाचा बदल केला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांची घोषणा केली. या निर्णयांमध्ये त्यांनी नोकर भरतीबाबत घेण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती दिली (Common Eligibility Test).
सरकारी नोकरीसाठी राष्ट्रीय निवड आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या आयोगात नोंदणी केल्यानंतर उमेदवारांना रेल्वे, बँक यासारख्या सरकारी नोकऱ्यांसाठी एकच परीक्षा (Common Eligibility Test) देऊन गुणवत्ता सिद्ध करता येणार आहे.
सरकारी नोकरीसाठी तरुणांना अनेक प्रकारचे फॉर्म भरुन वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागतात. मात्र, आता तरुणांना एकच फॉर्म भरुन विवध विभागांसाठी एकच परीक्षा देता येणार आहे. त्यांना फक्त परीक्षेसाठी राष्ट्रीय निवड आयोगामध्ये नाव नोंदणी करावी लागेल. या आयोगाचं मुख्यालय दिल्लीत राहील, अशी माहिती केंद्रीय मंत्री जिंतेद्र सिंह यांनी ‘टीव्ही 9 भारतवर्ष’सोबत बोलताना दिली आहे.
राष्ट्रीय निवड आयोग कसं काम करणार?
आतापर्यंत एखाद्या उमेदवाराने दोन वेगवेगळ्या विभागांमध्ये सरकारी नोकरीसाठी अर्ज केला असेल तर त्याला दोन परीक्षा द्याव्या लागायच्या. बऱ्याचदा या दोन्ही विभागांच्या परीक्षा एकाच तारखेला असायच्या. अशावेळी उमेदवाराला कोणत्याही एकाच परीक्षेला बसता यायचं. मात्र, आता राष्ट्रीय निवड आयोगाच्या एका परीक्षेत उमेदवार उत्तीर्ण झाला तर त्याला पुढच्या बँक आणि रेल्वे सारख्या इतर सरकारी नोकरीसाठी परीक्षा देता येईल.
“राष्ट्रीय निवड आयोगाच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा होतील. विशेष म्हणजे राष्ट्रीय निवड आयोगाच्या एकाच परीक्षेचे गुण पाहून उमेदवाराची दुसऱ्या विभागातही निवड होऊ शकते. त्यासाठी उमेदवाराला वेगवेगळे फॉर्म भरण्याती गरज नाही. या नव्या प्रक्रियेमुळे वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल”, अशी माहिती जिंतेंद्र सिंह यांनी दिली.